लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : संविधानावर घाला घातल्याचे सांगून काँग्रेस आणि विरोधक लोकांना फसवू लागले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांजवळ बोलताना सांगितले. संविधान लोकशाहीवर बोलण्याअगोदर आमदारांचा आदर करायला शिका, आमदारावर टीका करताना शब्द जपून वापरा, आमदाराच्या बाबतीत असंविधानिक शब्द वापरू नयेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिले, ते आमच्यासाठी प्राधान्य आहे. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत, तोपर्यंत संविधान कायम राहील. अल्पसंख्यांकांना घाबरवण्यासाठी दिशाभूल करणारी वक्तव्ये विरोधकांनी करू नयेत. तसेच लोकांना सर्वकाही माहिती आहे. ते अशा दिशाभूल करणाऱ्या विधानांना भुलणारे नाहीत, असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाने नेहमीच जातीधर्माच्या नावाने प्रचार केला. भाजपाला जाती धर्माच्या नावाने मते मागण्याची गरज नाही. राज्यात मोदी सरकारच्या कार्यकाळात विकासाची कामे जास्त झाली आहेत. विकासाच्या बाबतीत गोवा कुठेही मागे नाही.
२०१९ साली काही अवघ्या मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवी नाईक, आकेक्स सिक्वेरा व सुदिन ढवळीकर हे भाजपसोबत नव्हते, मात्र आज हे सर्वजण भाजपसोबत आहेत, भाजपाच्या उमेदवार पल्लवी धेपे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी अश्विन चंदू ए. यांच्याजवळ सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, मंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित होते.
केंद्र सरकाराने राज्याला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. दोन्ही जिल्ह्यांत विकासाची कामे केली आहेत. बुधवारी रामनवमी असल्याने मंदिरात जाऊन रामाचा आशीर्वाद घ्यायचा असल्याने आम्ही एक दिवस अगोदर उमेदवारी अर्ज भरण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
मात्र, विरोधकांकडून लोकांची दिशाभूल केली जाणारी वक्तव्ये केली जात आहेत. लोकांनी अशा वक्तव्यांपासून, अफवांपासून दूर राहावे. सोशल मीडियावरील बातम्यांची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.