-नारायण गावस
पणजी: देशाचे संविधान हे पवित्र ग्रंथाप्रमाणे असून त्याचा आपण आदर केला पाहीजे. तसेच या संविधानाविषयी व त्याच्या संरक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे मत कायदा मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केले. केंद्रीय कायदा मंत्रालय तसेच सीएससीतर्फे पणजीतील संस्कृती भवनमध्ये टेली लॉच्या ‘‘हमारा संविधान हमारा सन्मान’’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गोवा स्टेट लीगल सर्व्हीस ऑथोरेटीच्या मॅडम आंब्रे, ॲ. स्वाती केरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्र्याच्या हस्ते सीएससीच्या कामाचा पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
मंत्री सिक्वेरा म्हणाले, कायदा अभ्यास करणाऱ्या सर्व वकील तसेच इतर अभ्यासकांनी संविधानामार्फत सर्वसामान्य लाेकांना न्याय दिला पाहीजे. तसेच तळागळातील लाेकांना या संविधानाविषयी माहिती दिली पाहिजे. भविष्यात नवीन पिढीला त्यांचे कायदेशीर हक्क देण्यासाेबतच त्यांना समाजात जबाबदार नागरिक घडवून आणण्याचे काम हे तुमचे आहे. यामुळे तुम्ही संविधानाचा योग्य ताे वापर करुन समाजात होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे. देशाच्या संविधानानुसार कार्य केले पाहिजे, असे म्हणत त्यांनी उपस्थित सर्व कायदा अभ्यासकांना मार्गदर्शन केले.
यावेळी गोवा स्टेट लीगल सर्व्हीस ऑथोरेटीच्या मॅडम आंब्रे म्हणाल्या आम्ही या सेवेमार्फत लाेकांना मदत करत असतो. तसेच सर्व कायदा सेवाही त्यांना मोफत दिली जाते. लाेकांना कायद्याचा अभ्यास कळावा त्यांना संविधानाने दिलेले हक्क कळावे यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो, असेही त्यांनी सांगितले.
टेली-लॉ कार्यक्रमाने २०१७ मध्ये सुरू झाल्यापासून गेल्या सात वर्षांत भारतातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्याच्या परिणामातून ७० लाख पेक्षा जास्त लाभार्थींना कायदेशीर सल्ला/पूर्व-दाव्याचे सल्ले मिळाले. कार्यक्रमात गुंतलेल्या तळागाळातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करणे आणि राज्य सरकारच्या प्रमुख राज्य/जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे हा कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश आहे. भारताला प्रजासत्ताक म्हणून ७५ वे वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ २४ जानेवारी रोजी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते "हमारा संविधान हमारा सन्मान" या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे.