पणजी पोलिस ठाणा हल्ला प्रकरण: मोन्सेरात दांपत्यास थोडा दिलासा
By सूरज.नाईकपवार | Published: January 12, 2024 05:01 PM2024-01-12T17:01:27+5:302024-01-12T17:01:40+5:30
मंत्री बाबुश यांना तीन तर आमदार जेनिफरला दोन महिने सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा
मडगाव: पणजी पोलिस ठाणा हल्ला प्रकरणात मोन्सेरात पती पत्नीला थोडासा दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांना या खटल्याच्या सुनावणीस तीन महिने तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांना दोन महिने सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाने आज शुक्रवारी दिली. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.
खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी दि. ५ जानेवारीला मोन्सेरात दांपत्याने या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाने दयावी असा अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यावर आज न्यायालयाने आपला निवाडा दिला.
या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा उपअधिक्षक सुदेश नाईक यांचीही उलटतपासणी पुर्ण झाली. कालच्या सुनावणीच्या वेळी मंत्री बाबुश मोन्सेरात हे अनुपस्थित होते तर आमदार जेनिफर मोन्सेरात या हजर होत्या. सर्व संशयितांचे वकील तसेच सीबीआयचे वकील नौशाद पी. एम. हेही सुनावणीस हजर होते. बाबुश मोन्सेरात हे ताळगावचे आमदार असताना पणजी पोलिसांनी अटक केलेल्या त्यांच्या समर्थकाबाबत जाब विचारण्यासाठी ते पणजी पोलिस ठाण्यावर चाल करुन गेले होते. त्यावेळी मोन्सेरात समर्थकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करुन नासधूस केली होती.