पर्रीकरांची उद्या पंतप्रधानांशी चर्चा
By admin | Published: March 29, 2017 09:47 PM2017-03-29T21:47:53+5:302017-03-29T22:13:06+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 29 - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार असून, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत. अमित शहा यांची येत्या ९ एप्रिल रोजी गोवा भेट झाल्यानंतर मग मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली.
पर्रीकरांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची येथे बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीत अमित शाह यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळातील दोन जागा रिकाम्या आहेत. भाजपच्याच आमदारांना त्या जागी स्थान दिले जाईल, असे तेंडुलकर यांनी सांगितले.
पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मिनेझिस ब्रागांझा संस्थेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीची जागा रिकामी करण्याची तयारी आहे. मी पर्रीकर यांना तसे सांगितले आहे. येत्या १४ सप्टेंबरपर्यंत विधानसभेची पोटनिवडणूक होणे गरजेचे आहे, असेही कुंकळयेकर म्हणाले. दरम्यान, पणजी व वाळपईत एकाच वेळी पोटनिवडणूक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.