पणजीत पे पार्किेंग तूर्त बंद: महापौर रोहित मोन्सेरात
By किशोर कुबल | Published: March 23, 2024 02:30 PM2024-03-23T14:30:35+5:302024-03-23T14:31:51+5:30
स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन कंत्राटदारांना घालून दिलेली आहे.
किशोर कुबल, पणजी : राजधानी शहरात स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईस्तोवर येत्या ३१ मेपर्यंत पणजीत पे पार्किेग शुल्क आकारले जाणार नाही. तसे निर्देश महापौर रोहित मोन्सेरात यांनी कंत्राटदारांना दिले आहेत.
उद्या रविवार २४ पासून हा निर्णय लागू होईल. शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत. आधीच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करण्याची अडचण असताना व पार्कीगसाठी जागा राहिलेली नसताना ‘पार्किग शुल्क लागू करणे अन्यायकारक असल्याच्या तक्रारी महापौरांकडे आल्या होत्या. याची गंभीर दखल घेण्यात आली.
महापालिकेने शहरात प्रमुख मार्गांवर पे पार्किंग लागू केले आहे. ८० टक्के मार्ग 'पे पार्किंग' खाली आहेत. रस्त्याच्या कडेला अनेकदा टुरिस्ट टॅक्सी तसेच सरकारी वाहने ठेवली जातात. अनेकदा बेवारस वाहनेही असतात. राजधानी शहरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन कंत्राटदारांना घालून दिलेली आहे. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेंट लि,चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स दैनंदिन तत्त्वावर कामांचा आढावा घेत आहेत.