बंड केले नाही म्हणून राजकीय समीकरणेही अबाधित - लक्ष्मीकांत पार्सेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 09:59 PM2019-05-31T21:59:46+5:302019-05-31T22:40:19+5:30
पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील महत्त्वाचे नेते आहेत.
पणजी : मी भाजपाचे काम करत राहीन, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. आपण बंड केले नाही व पोटनिवडणूक लढवली नाही म्हणून राज्यातील राजकीय समीकरणेही अबाधित राहिली असाही पार्सेकर यांचा दावा आहे.
पार्सेकर हे भाजपाचे गोव्यातील महत्त्वाचे नेते आहेत. ते दोनवेळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र मध्यंतरी त्यांनी भाजपाच्या एका अधिकृत उमेदवाराविरुद्ध आपण निवडणूक रिंगणात उतरीन असे जाहीर केल्याने त्यांच्यावर दयानंद सोपटे या निवडणुकीत जिंकून आलेल्या उमेदवाराने टीका केली. पार्सेकर यांच्या समर्थकांनी आपल्याविरुद्ध काम केले पण तरीही आपण जिंकलो असे सोपटे यांनी नमूद केले. तसेच पार्सेकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा सोपटे यांनी दावा करून पार्सेकरांची कृती ही त्यांना पक्षातून बाहेर काढण्याच्या स्तरावरील आहे, अशीही टिप्पणी केली.
या पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी लोकमतला फोनवरून मुलाखत दिली. दिल्ली भेटीत पार्सेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल आदींची भेट घेतल्याची माहिती मिळते. तथापि, पार्सेकर म्हणाले, की मी पोटनिवडणुकीच्या काळात कोणत्याच भाजपाविरोधी कारवाया केल्या नाहीत. मी पक्षाचे अधिकृत उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची प्रारंभी तयारी केली होती पण ज्या दिवशी मी भाजपामधून बाहेर जाणार नाही व निवडणुकही लढवणार नाही असे ठरवले, त्या दिवसापासून मी भाजपाचेच काम करत आहे.
मी निवडणूक काळात माझ्या शैक्षणिक संस्थांच्या कामात व्यस्त राहिलो. मी सोपटे यांना मत देऊ नका, असे एकाही भाजपा कार्यकर्त्याला किंवा इतरांनाही सांगितले नाही. मी भाजपाचे काम निष्ठेने करत राहीन. जर मी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलो असतो तर निश्चितच जिंकूनही आलो असतो व भाजपचा एक माजी मुख्यमंत्रीच बंड करून निवडणूक लढवत असल्याचा संदेश सगळीकडे गेला असता. या संदेशाचा परिणाम म्हणून शिरोडा व म्हापसा मतदारसंघातीलही राजकीय समीकरणे प्रभावित झाली असती. मी तसे काही केले नाही.