पणजी : जुने गोवे येथील वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बंगल्याला स्थानिक पंचायतीकडून आठवडाभराच्या आत अधिवास दाखला देण्यात आल्याचे आरटीआय अर्जाला प्राप्त झालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. आयरिश रॉड्रिग्स यांनी आरटीआय अर्ज केला होता. मडकईकर यांच्या निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि ने गेल्या ५ जानेवारीला अर्ज केला आणि ११ जानेवारीला त्यांना अधिवास दाखला देण्यात आला. ८ जानेवारीला पंचायतीने बैठकीत याला मान्यता दिली. बांधकामाचा परवानाही १५ दिवसात देण्यात आला. १५ जानेवारी २0१३ रोजी अर्ज करण्यात आला होता. पंचायतीने २ फेब्रुवारी २0१३ रोजी बांधकाम परवाना दिला. अभियंता परेश गायतोंडे यानी त्यावेळी पंचायतीला दिलेल्या पत्रातील माहितीनुसार या आलिशान बंगल्याचा अंदाजित खर्च १ कोटी ४२ लाख ४६ हजार ४८५ रुपये आहे.
माशेल येथील स्वरभूमी बिल्डर्सकडून निकिताशा रीयाल्टर्स प्रा. लि च्या व्यवस्थापकीय संचालक जेनिता मडकईकर यांनी ११ आक्टोबर २00४ रोजी २0 लाख रुपये मोजून ३५,१२५ चौरस मीटर भूखंड खरेदी केला. त्यावेळी मडकईकर हे महसूलमंत्री होते. या कृषी जमिनीत सागवानची २0, फणसाची ४, आंब्याची ३, ३0 माड आदी झाडे होती. ७ फेब्रुवारी २00८ रोजी या जमिनीचे रुपांतर झाले आणि ३ मार्च २00८ रोजी त्यांना सनद प्राप्त झाली. त्यावेळी मडकईकर हे वाहतूकमंत्री होते, असे आयरिश यांनी आरटीआय अर्जाच्या उत्तराचा हवाला देताना म्हटले आहे.