वास्को: देशसेवेसाठी उत्तमरित्या काम करणाºया भारतीय नौदलाच्या हवाई विभागाचे ६८ व्या वर्षात पदार्पण होत असल्याने हा एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला माझ्याकडून ‘प्रेसिडेंट कलर्स’ प्रदान करण्यात येत असल्याने ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. गोव्यातील भारतीय नौदलाच्या हंस तळाच्या हीरक मोहत्सवी वर्षानिमित्ताने आणि भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ हा प्रतिष्ठेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यासाठी सोमवारी (दि.६) आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दाबोळीतील नौदलाच्या उड्डाणपट्टी क्षेत्रात आयोजित त्या खास कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासहीत गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना, भारतीय नौदल कर्मचारी - अधिकारी प्रमुख एडमिरल करंबीर सिंग, व्हास एडमिरल हरी कुमार, नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फीलीपोझ पायनमुत्तील व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतीय नौदलाच्या जवानांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना दिली. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ हा प्रतिष्ठेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
६८ वर्षापासून भारतीय नौदलाचे हवाई विभाग देशसेवेसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद - अभिनंदनास्पद असल्याचे म्हणाले. नौदलाच्या हवाई विभागाने सतत देश सेवेसाठी उत्तम कामगिरी बजाविल्यानेच त्यांना ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. १९५३ सालात भारतीय नौदलाने ‘आयएनएस गरुडा’ या ‘एअर स्टेशन’ चे अनावरण केल्यानंतर पुढच्या वर्षात नौदलाच्या हवाई विभागाचा भरारीने विकास झाला आहे. १९६१ सालात भारतीय नौदलात ‘आयएनएस विक्रांत’ लढाऊ विमाने हाताळणारे जहाज सामील झाल्याने दलाचे बळ आणखीन वाढले असल्याचे कोविंद म्हणाले.
विक्रांतची गोवा मुक्तीसाठीही मोलाची कामगिरी
‘आयएनएस विक्रांत’ जहाजाने गोवा मुक्तीसाठी महत्वाची कामगिरी बजावली होती अशी माहिती राष्ट्रपती कोविंद यांनी दिली. सुरुवातीला नौदलाच्या हवाई विभागाने स्थिर प्रवास सुरू केल्यानंतर भविष्यात नौदलाचा हवाई विभाग बरेच शक्तीशाली झाले आहे. आयएनएस विराट, आयएनएस विक्रमादित्य या लढाऊ विमाने हाताळणारी जहाजे भारतीय नौदलात रुजू झाल्यानंतर हवाई दलाचे बळ बरेच शक्तीशाली झाले. मागील वर्षात भारतीय नौदलाच्या हवाई विभागाने देशहितासाठी युद्धात भाग घेऊन उत्तम कामगिरी बजावल्याची माहिती राष्ट्रपतींकडून देण्यात आली.
शहीदांना श्रद्धांजलीदेशाच्या सुरक्षेच्या हीतासाठी काम करण्याबरोबरच हवाई विभागाने विविध आपतकालीन वेळेत लोकांना मदत करणे, बचावकार्य करणे अशा प्रकारची पावले उचललेली आहेत. कोविड काळातसुद्धा भारतीय नौदलाच्या हवाई विभागाने जनहीतासाठी उत्तम कामगिरी बजावलेली आहे. हवाई विभागाचा देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी मागील वर्षात बहुमूल्य योगदान असून पूर्वीचे तसेच आताचे त्यांचे अधिकारी - कर्मचारी अभिनंदनास्पद असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. या कार्यक्रमावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी देशसेवे वेळी शहीद झालेल्या भारतीय नौदलाच्या हवाई विभागाच्या शूरांना आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भारतीय नौदलाच्या हवाई विभागाच्या विविध लढाऊ विमान, हॅलिकोप्टरांनी ‘फ्लायपास्ट’ (कवायती) चे सादरीकरण केले.