पणजी : गोवा सरकार स्थापन झाल्यानंतर 425 दिवसांनी गोव्यातील काँग्रेस पक्ष जागा झाला आहे व त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या या नाटकाचा आम्ही भाजपतर्फे निषेध करतो, असे सरचिटणीस व खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
आमदार ग्लेन तिकलो यांच्या उपस्थितीत सावईकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की गोव्यातील काँग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त झाला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी नाटके केली जात आहेत. काँग्रेसचे तेराच आमदार राज्यपालांकडे गेले होते. स्वत:च्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व काँग्रेस पक्ष ही नाटके करत आहे. लोक अशा प्रकारचा अभिनय स्वीकारणार नाहीत.
सावईकर म्हणाले,की काँग्रेस पक्ष गोव्यातील र्पीकर सरकार बरखास्त करण्याची जगावेगळी मागणी करत आहे. सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीबाबत सर्व लोकांना माहिती आहे. लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. ते लवकरच गोव्यात परततील.
राज्यपालांना तुम्ही कोणता सल्ला द्याल असे पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांना आम्ही काहीच सांगणार नाही, काय निर्णय घ्यायचा तो राज्यपाल घेतील. देशभर भाजप विविध निवडणुका जिंकत आहे. याउलट काँग्रेस पक्ष पराभूत होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे अपयश लपविण्यासाठीच गोव्यातील काँग्रेस पक्ष सध्या अकारण राज्यपालांकडे धाव घेण्याचे कृत्य करत आहे. कर्नाटकमधील जनतेने भाजपच्याच बाजूने कौल दिला व काँग्रेसची आमदार संख्या कमी केली आहे, असेही सावईकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिला असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, न्यायालयीन आदेशाचा मान राखला जाईल, असे सावईकर म्हणाले. न्यायालयाचा आदेश ही भाजपसाठी नामुष्की नव्हे, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसची सर्कस : सरदेसाई
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे मंत्री व अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही काँग्रेसच्या कृतीची खिल्ली उडवली आहे. बंगळुरूमध्ये पाऊस पडला म्हणून काही गोव्यात पाऊस पडणार नाही. कर्नाटकचे आमदार काही गोव्यात मतदान करू शकत नाहीत. त्यासाठी गोव्याचेच आमदार हवे असतात. गोव्यात काँग्रेसकडे सुरुवातीला जेवढे आमदार होते, तेवढेही आमदार आता राहिलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील सध्याच्या राजकारणाचा गोव्यातील राजकारणाशी काहीच संबंध नाही. गोव्यातील काँग्रेस आमदारांनी राज्यपालांकडे धाव घेणो ही काँग्रेसची पीआर सर्कस आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. खरे म्हणजे काँग्रेसच्या कृतीविषयी भाष्य करावेसेही वाटत नाही, असे ते म्हणाले.