ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12 - आपल्या सख्ख्या बहिणला बंद खोलीत तब्बल 10 वर्षे कोंडून ठेवण्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कांदोळी येथे उघडकीस आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करून तिची सुटका करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अमानुषतेचा कळस गाठावा, असा हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी पणजीहून महिला पोलीस कांदोळी येथे पीडित महिलेच्या घरी गेले आणि घराबाहेरील एका छोट्या खोलीत डांबून ठेवलेल्या 50 वर्षीय महिलेला त्यांनी सोडविले. सुनिता वेर्लेकर असे या महिलेचे नाव आहे. तिचे लग्न झाले होते; परंतु नंतर काही कारणांमुळे ते टिकू शकले नाही. तिला तिच्या पतीने आईच्या घरी आणून सोडले, असे तिचा भाऊ आणि भावजय सांगते. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर भावाने आणि भावजयीने मिळून तिला घराबाहेर असलेल्या छोट्या खोलीत कोंबून ठेवले. फक्त तिला जेवण दिले जात होते. धड आंघोळ नाही, नैसर्गिक विधींसाठी बाहेर जायला वाव नाही, अशा अवस्थेत अत्यंत घाणेरड्या स्थितीत तिला त्या खोलीत ठेवण्यात आले होते. अंगावर घालायला धड कपडेही देण्यात आले नव्हते. महिला पोलिसांनी अगोदर तिच्या अंगावर कपडे घालून नंतर तिला बाहेर काढले.बहिणीला खोलीत कोंडून ठेवल्याची कबुली भावाने दिली आहे; परंतु ती मानसिकदृष्ट्या ठिक नव्हती, यासारखी कारणे देऊन आपल्या कर्माचे समर्थनही त्याने केले. ती नेमकी किती वर्षे त्या खोलीत बंद होती, याचा पक्का अंदाज कोणीही देऊ शकत नाही. काहींच्या मते ती ६ वर्षे, काहींच्या मते 10 वर्षे, तर काही जण 15 वर्षे ती खोलीत बंद होती, असे सांगतात.या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत गुन्हा नोंदविला नव्हता. सुनिताला बांबोळी येथील गोमेकॉत नेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली.ईमेलमुळे प्रकार आला उघडकीसबायलांचो साद या संघटनेच्या प्रमुख सबिना मार्टिन्स यांना ही माहती कोणी तरी ईमेलच्या माध्यमातून दिली होती. तो ईमेल सबिना यांनी पणजी महिला पोलिसांना पाठविला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.