पणजी : पेडणेचे आमदार तथा विद्यमान सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा मंत्री म्हणून गुरुवार, दि. १ आॅक्टोबर रोजी सायंकाळी राजभवनवर शपथविधी केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी रात्री केली. सभापतीपदी अनंत शेट यांची निवड केली जाईल, हेही त्यांनी जाहीर केले. भाजपच्या सर्व मंत्री आणि आमदारांची एकत्रित बैठक येथील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री घेतली. सोमवारी रात्री गोव्यात दाखल झालेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेही या बैठकीस उपस्थित होते. पर्रीकर व पार्सेकर यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे या बैठकीस उपस्थित होते. बैठक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संपली व पर्रीकर यांनी पत्रकारांकडे आर्लेकर यांच्या नावाची मंत्री म्हणून घोषणा केली. या वेळी आर्लेकर हेही उपस्थित होते. त्यांना अन्य आमदारांनी शुभेच्छा दिल्या. अनंत शेट व वाघ हेही या वेळी उपस्थित होते. वाघ यांना उपसभापतीपद दिले जाणार आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आर्लेकर यांना कोणते खाते दिले जाईल, असे पत्रकारांनी विचारले असता, ते लवकरच ठरेल, असे ते म्हणाले. सर्व मंत्र्यांची खाती बदलली जातील काय असे विचारले असता, खात्यांबाबत किरकोळ बदल होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा किंवा मंत्री रमेश तवडकर यांच्याकडे असलेले एखादे वजनदार खाते आर्लेकर यांना दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. ‘मगो’बाबत मंगळवारच्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही, असे एका आमदाराने सांगितले. चतुर्थीपूर्वी शपथविधी झाला असता, तर अनंत शेट यांना मंत्रीपद मिळाले असते, असेही एक आमदार म्हणाले. आर्लेकर हे आपल्या कारकिर्दीत प्रथमच मंत्री बनत आहेत. (खास प्रतिनिधी)
राजेंद्र आर्लेकरांना मंत्रीपद
By admin | Published: September 30, 2015 1:18 AM