गोव्यात पोलिसांना लाच देऊन रेव्ह पार्ट्या, आमदार विनोद पालयेंकर यांचा रोखठोक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 09:24 PM2020-08-16T21:24:10+5:302020-08-16T21:25:26+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते असले तरी केवळ खनिज वाहतुकीतच त्यांना रस आहे. कायदा सुव्यवस्थेचे त्यांना सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री गुन्हेगारी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
पणजी - रेव्ह पार्टी झालेले वागातोर ज्या मतदारसंघात येते त्या शिवोलीचे गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेंकर यांनी तीव्र संताप व्यक्त करताना असे म्हटले आहे की, किनारपट्टी भागात राजरोसपणे रेव्ह पार्ट्या होत असल्याचे मी वेळोवेळी सरकारच्या निदर्शनास आणले, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली. स्थानिक पोलिसांना लांच देऊन बिनदिक्कत रेव्ह पार्ट्यांची आयोजन केले जात आहे. हणजुण पोलिस निरीक्षकासह इतरांना या स्थानकावरुन हटवून पूर्णपणे फेररचना करायला हवी. तसेच राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री आवश्यक आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह खाते असले तरी केवळ खनिज वाहतुकीतच त्यांना रस आहे. कायदा सुव्यवस्थेचे त्यांना सोयरसूतक नाही. मुख्यमंत्री गुन्हेगारी हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
लोबोच गृहमंत्री योग्य
दरम्यान, पालयेंकर यांनी उपरोधिकपणे असेही म्हटले आहे की, ह्यमंत्री मायकल लोबो हे गृहमंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लोबो यांना गृह खाते द्यावे.
कळंगुटमध्ये राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंध - अपक्ष आमदार रोहन खंवटेंचा आरोप
दरम्यान, कळंगुटमध्ये राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंध असल्याचा आरोप अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला असून पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना यांनी वागातोर येथे रेव्ह पार्टीवर धडक कारवाई केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. राजकारणी-ड्रग माफिया हितसंबंधांची माहिती डीजीपींनाही आहे, असे खंवटे म्हणतात. गोवेकरांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नवे डीजीपी चांगली कामगिरी बजावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कळंगुट किनारपट्टी भागात क्वारंटाइन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यामागे ड्रग्स हेही एक कारण आहे. पर्यटक बंद झाल्यास ड्रग्स बंद होतील, ही भीती या माफियांना आहे, असे खंवटे यांनी म्हटले आहे.