लोकमत न्यूज नेटवर्क उसगाव : येत्या जून महिन्यापासून पुन्हा सत्तरी व उसगावच्या युवा-युवतींना सरकारी नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. आतापर्यंत उसगावातील २५० युवा- युवतींना सरकारी नोकऱ्या दिल्या. आणखी १५०० सरकारी नोकऱ्या देण्यात येणार आहेत, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी केला.
उसगाव येथील उडीवाडा, मेडीतेंबी, तिराळ, टाकवाडा येथे कोपरा बैठका बुधवारी घेण्यात आल्या. सायं. ६:३० ते रात्री ९:२० वाजेपर्यंत या बैठका घेण्यात आल्या. अडीच कोटी रुपये खर्च करून पाचावाडा- उसगाव येथील आदिनाथ देवाचे नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे. मंदिर निर्माणकार्य योजले होते त्यावेळी आदिनाथ देवस्थान समिती माझ्याजवळ आली होती. देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकारी व सभासदांची बैठक घेण्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोललो आहे, अशी माहिती मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी सायंकाळी उसगावच्या विविध भागांत झालेल्या कोपरा बैठकांमधून दिली आहे.
मी अनेक मंदिरे बांधली आहेत. आदिनाथ हे ग्रामदैवत असल्याने तसेच त्याचे लाखो लोक भाविक असल्याने हे मंदिर मी बांधून देणार आहे, असेही ते पुढे म्हणाले. त्यांच्या सोबत उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, उसगावचे सरपंच रामनाथ डांगी, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य गोविंद परब फात्रेकर, संजय ऊर्फ प्रकाश गावडे, राजेंद्र नाईक, विनोद मास्कारेन्स, रेश्मा मटकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आदींसह मंत्री राणे यांचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
होय, नोकऱ्या देईनच!
मी सरकारी नोकऱ्या माझ्याच मतदारसंघातील युवा-युवतींना देतो म्हणून सोशल मीडिया व विधानसभेत माझ्यावर टीका केली जाते. यापुढे माझ्याजवळ असलेल्या सर्व खात्यांत सत्तरी व उसगावातील युवा-युवतींना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्यात येईल. मागील निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या अगोदर वयोमर्यादा उलटून गेलेल्यांनाही मी सरकारी नोकऱ्यांत सामावून घेतले आहे. येत्या जून महिन्यापासून पुन्हा सत्तरी व उसगावच्या युवा-युवतींना सरकारी नोकऱ्यांत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे राणे यांनी सांगितले.
कॉल सेंटरवर १२० लोक
उसगावातील लोकांसाठी चार कॉल सेंटर सुरु करणार आहे. उसगावात एकूण ११ प्रभाग आहेत. प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक कॉल सेंटर असेल. त्या कॉल सेंटरला एक टोकन क्रमांक असेल. तिथे कॉल करून आपण हव्या त्या सुविधा, योजनांचा लाभ घेऊ शकता. आपल्या घरातील आजारी व्यक्तींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ तसेच राज्यातील सर्व सरकारी दवाखाने व इस्पितळात चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळतील. सध्या प्रचार करण्यासाठी कॉल सेंटरवर १२० लोक आहेत. पुढे सुरू करण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर २५ लोक काय- मस्वरूपी असतील, असे मंत्री राणे म्हणाले.
उसगावचा मास्टर प्लॅन
तीन वर्षांसाठी उसगावचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यातील सर्व विकासकामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन मंत्री राणे यांनी यावेळी दिले.