आधी गुन्हा नोंद करा, पुरावे सहज मिळतील: सुदीप ताम्हणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2024 12:24 PM2024-11-18T12:24:01+5:302024-11-18T12:24:39+5:30

कुळे पोलिसांनी ताम्हणकर यांच्याकडे या प्रकरणातील पुरावे मागितले होते.

register crime first then evidence will be easy said sudip tamhankar | आधी गुन्हा नोंद करा, पुरावे सहज मिळतील: सुदीप ताम्हणकर

आधी गुन्हा नोंद करा, पुरावे सहज मिळतील: सुदीप ताम्हणकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सावर्डेचे आमदार गणेश गांवकर यांच्याविरुद्ध नोंदविलेल्या नोकरी विक्री प्रकरणातील तक्रारीवर गुन्हा नोंद करा, नंतर पुरावे सहज मिळतील, असे लेखी उत्तर तक्रारदार सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलिसांना दिले आहे. कुळे पोलिसांनी ताम्हणकर यांच्याकडे या प्रकरणातील पुरावे मागितले होते.

एका बाजूने नोकरी विक्री प्रकरणात मोठ्या प्रमाणावर नवनवी प्रकरणे उघडकीस येत आहेत. दुसऱ्या बाजूने सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्ध आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी नोंदविलेली तक्रारही चर्चेचा मुद्दा ठरली आहे. या तक्रारदाराकडेच पोलिसांनी पुरावे मागितले आहेत, परंतु गुन्हा नोंद केल्यावर पुरावे सहज मिळू शकतील, असे ताम्हणकर यांनी कुळे पोलिसांना सुनावले आहे.

पोलिसांना दिलेल्या उत्तरात ताम्हणकर यांनी शांभा गावडे नामक व्यक्तीचाही उल्लेख आमदाराचे 'पीए' म्हणून केला आहे. त्याची जबानी नोंदविल्यास पुरावे सापडतील, असे म्हटले आहे. तक्रारीत 'कार्यकर्ता' असा उल्लेख केलेला माणूस कोण? याचे उत्तर ताम्हणकर यांनी गीतेश गावकर असे दिले आहे. तो राज्य कर्मचारी विमा महामंडळात फार्मासिस्ट असल्याचेही म्हटले आहे.

ऑडिओचा स्रोत काय, कुठे मिळाला...

एका व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर ताम्हणकर यांनी ही तक्रार कुळे पोलिस स्थानकात नोंदविली होती. त्यात 'तो' आवाज आमदार गावकर यांचा असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीसंबंधी तपास करताना कुळे पोलिसांनी तक्रारदार ताम्हणकर यांना काही प्रश्न केले आहेत. तक्रारदारालाच त्यात ते या प्रकरणातील पुरावे सादर करण्यास सांगतात. ऑडिओ क्लिपचा मूळ स्रोत काय आहे व तो कुठे मिळाला, याची माहिती मागितली आहे.

संशयितालाच ताब्यात घेऊन चौकशी करा

तक्रारदारानेही या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली आहेत. अतिरिक्त पुरावे असल्यास संशयितालाच ताब्यात घेऊन जबानी नोंदवून घेण्यास सांगितले आहे, तसेच ही ऑडिओ क्लीप यापूर्वीच पोलिसांना आपण सादर केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Web Title: register crime first then evidence will be easy said sudip tamhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.