‘निवडणूक आयोगाच्या नोटिसीला आज उत्तर देणार’
By admin | Published: February 3, 2017 01:39 AM2017-02-03T01:39:18+5:302017-02-03T01:39:18+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाने माझ्याविरुद्ध नोटीस बजाविताना चुकीची प्रक्रिया स्वीकारली आहे. तथापि, शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत मी त्या नोटिसीला उत्तर देईन, असे
पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने माझ्याविरुद्ध नोटीस बजाविताना चुकीची प्रक्रिया स्वीकारली आहे. तथापि, शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत मी त्या नोटिसीला उत्तर देईन, असे संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक प्रचारसभेत पैसे वाटपासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
‘माझ्याविरुद्धची नोटीस निवडणूक आयोगाने आधी आयोगाच्या संकेतस्थळावर टाकली. ज्याला नोटीस पाठवायची असते, त्याच्याकडे ती पोहचण्यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. दिल्लीहून पत्रकारांचे फोन येऊ लागले, तेव्हा मला या नोटीसबद्दल कळले.
त्यामुळे मी फोन करून त्याविषयी आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारले. शेवटी बुधवारी रात्री मला पणजीतील एका सभेत नोटीसचा लिफाफा आणून देण्यात आला, असे पर्रिकर यांनी सांगितले.
पर्र्वरी मतदारसंघातील एक निवडणूक अधिकारी पक्ष:पाती असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला व आक्षेपार्ह नोटिसा पाठविण्याऐवजी अशा अधिकाऱ्यांविरुद्ध आयोगाने आधी कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)