पणजी : येथे २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ४९व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. ही माहिती इफ्फीचे गोव्यातील आयोजक असणाऱ्या गोवा मनोरंजन संस्थेचे (ईएसजी) उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
तालक म्हणाले, प्रतिनिधी नोंदणीसाठी लोकांकडून एक हजार रुपये शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी मोफत असेल. दोन वर्षांपासून जे प्रतिनिधी इफ्फीत नोंदणी करीत आहेत, त्यांचे अर्ज चोवीस तासांत मंजूर केले जातील. नवीन अर्ज ४८ तासांत मंजूर केले जातील. नोंदणीसाठी इफ्फीच्या संकेतस्थळावर लॉगइन करावे.
यंदाचा उद्घाटन व समारोप सोहळा हा बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमध्ये पार पडेल. पहिल्या चित्रपटाचा खेळ हा कला अकादमीत होईल. इफ्फीच्या सजावटीसाठी सल्लागार म्हणून भूपल रामनाथकर यांची नियुक्ती केली आहे. यंदा कंट्री फोकस म्हणून इस्राइलची निवड केली असून या विभागात ६ ते ७ चित्रपट दाखविले जातील. श्रद्धांजली विभागात अभिनेता शशी कपूर, अभिनेत्री श्रीदेवी व विनोद खन्ना यांना अभिवादन केले जाईल. शिवाय क्रीडा विभागात ६ ते ७ सात चित्रपट दाखविले जातील.
बायोस्कोप हा विभाग यंदा सागच्या मैदानावर आयोजिला जाईल. हा सर्वांसाठी खुला असेल. त्याचबरोबर सांगीतिक मैफली होतील. त्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे रात्री नऊनंतर सादरीकरण करतील. विशेष चित्रपट विभाग कपूर घराण्याला समर्पित केला आहे. यामध्ये पृथ्वीराज कपूर ते रणबीर कपूर यांचे चित्रपट दाखविले जातील. या विभागाचे उद्घाटन कपूर कुटुंबीयातील व्यक्तीकडून केले जाईल, अशी माहिती तालक यांनी दिली.