लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : ऐशो आरामाचे आयुष्य मिळेल, अशा भूलथापा देवून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासात छडा लावताना पीडित मुलींची सुटका करून दोघा अपहरणकर्त्यांना धारवाड हुबळी येथून अटक केली. त्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेवून पालकांकडे सुपूर्द केले.
या प्रकरणात अपहरण झालेल्या एका मुलीचे वय १२ वर्षे तर दुसऱ्या मुलीचे वय १५ वर्षे होती. यापैकी एक मुलगी हिंदू तर एक मुलगी मुस्लिम समाजातील आहे. पीडित मुलींना हुबळीत एका घरात डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी नवीन अहमद पानीबंद आणि तौसिफ किल्लेदार या दोघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस उप अधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले की, या प्रकरणी दोन्ही मुलींच्या पालकांनी सोमवारी, २९ रोजी कोलवाळ पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याने गोवा बाल अधिनियम कायदा ३६३ तसेच आयपीसी ८ अंतर्गत स्वतंत्र तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या.
तपासासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली. अल्पवयीन पीडित मुली कुठे गेल्या याचा शोध पोलिसांनी सुरू केला. मुलींच्या घरचांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान चौकशीत आणि मोबाइलद्वारे लोकेशन तपासल्यावर दोन्ही मुली हुबळीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांना शोधण्यासाठी तयार करण्यात आलेले पथक उपनिरीक्षक मंदार परब यांच्या नेतृत्वाखाली हुबळीला रवाना झाले.
हुबळी पोलिसांच्या मदतीने कसबा पेठ परिसरात मुलींचा शोध घेण्यात आला. यांदरम्यान त्या दोघांना एका घरात कोंडून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित अहमद पानीबंद याच्या घरात मुलींना ठेवण्यात आले, त्या घराला बाहेरून कुलूप लावले होते. पोलिसांनी तातडीने त्या घरावर छापा मारून मुलींची सुटका केली. त्याला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर त्याने तौसिफ किल्लेदार याने मुलींचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यालाही त्या परिसरातून ताब्यात घेतले.
दोघांही संशयितांना गोव्यात आणण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे असे पोलिसांनी सांगितले. उत्तर गोव्याचे पोलीस अधिक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जिवबा दळवी, पोलीस निरीक्षक सोमनाथ माजीक, सीताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबविण्यात आली.
घरातून चोरले दागिने
दोन्ही मुली संशियतांच्या भूलथापांना बळी पडल्या होत्या. ऐशोआरामाचे आयुष्य तुम्हाला मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. त्या आमिषापोटी मुलींना त्यांच्या घरातील दागिन्यांची चोरी करण्यात संशयिताने भाग पाडल्याचे तपासात उघड झाले. संशयितांनी हे चोरीचे दागिने हुबळीतील एका सोनाराला विकून टाकले होते. पोलिसांनी दागिने जप्त केले.
पालकांनीही सावध रहावे
'अपहरण करण्यात आलेल्या या अल्पवयीन मुलींची वेळीच सुटका झाली नसती तर त्यांना कदाचित मोठ्या धोक्याला तोंड द्यावे लागले असते. सुदैवाने वेळीच तक्रार दाखल झाली आणि गतीने तपास झाल्याने त्यांची सुटका होवू शकली, असे प्रकार घडू नये यासाठी पालकांची भूमिकासुद्धा अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक जीवबा दळवी यांनी यावेळी केली.
सोशल मीडियावरून झाली ओळख
तौसिफ हा या दोन मुलींपैकी एकीला ओळखत होता.सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली. या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याने सांगितल्यानुसार, ती मुलगी दागिने चोरून पळायला तयार झाली. मात्र, तिने स्वतः पळून जाताना आपल्यासोबत मैत्रिणीलाही नेले असे तपासात उघड झाले आहे.