मडगाव: वाहतूकीच्या दृष्टीने मडगाव शहरातून मिरवणूक काढणो योग्य नसल्याचा अभिप्राय वाहतुक व शहर पोलिसांनी दिलेला असतानाही आज होणारी शिवजयंतीची मिरवणूक शहरातून काढण्यास जिल्हा प्रशासनाने शेवटी परवानगी दिली. असे जरी असले तरी या मिरवणुकीत दुचाक्याचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एकाबाजूने प्रशासनाने शहरातून मिरवणूक काढण्यास परवानगी दिलेली असताना दुस:याबाजूने शहरातून मिरवणूक काढण्यास विरोध करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून 20 फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मडगावच्या लोहिया मैदानावर सांगता होणा:या या मिरवणुकीचा कार्यक्रम सायंकाळी 6.30 र्पयत आटोपता घ्यावा अशी आयोजकांना अट घालण्यात आली आहे. सासष्टीचे उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांना विचारले असता, आकेमार्गे लोहिया मैदानार्पयत येण्यासाठी या मिरवणुकीला परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र चित्ररथ असलेली वाहने वगळता अन्य कुठल्याही वाहनांना या मिरवणुकीत आणता येणार नाही असेही स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवजयंतीच्या या मिरवणुकीला शहरातून काढण्याची परवानगी मिळाल्यामुळे आता कार्निव्हलची मिरवणूकही शहरात आणण्याचा मार्ग खुला झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे जरी असले तरी या कार्निव्हल मिरवणुकीच्या रस्त्याला विरोध करणारी याचिका गुरुवारी सकाळी सुनावणीस येणार असल्याने या सुनावणीवरच पुढील गोष्टी ठरणार आहेत. फातोर्डा येथील किस्तोदियो डायस यांनी ही याचिका दाखल केली आहे.
शिवजयंतीची ही मिरवणूक शहरात आणली तर वाहतुकीला त्याचा त्रस होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. ज्या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात येणार आहे तेथे यापुर्वी धार्मिक कारणावरुन दंगलीही झाल्या होत्या. या पाश्र्र्वभूमीवर या मिरवणुकीला शहरात येण्याची परवानगी मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने आता हिरवा कंदील दाखंिवल्याने या मिरवणुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हाऊसिंग बोर्ड येथील ऋषीरंभा राखणदेव देवस्थानाकडून दुपारी 1.30 वाजता ही मिरवणूक सुरु होणार आहे त्यानंतर शिवाजी चौक, रुमडामळ—दवर्ली, मारुती मंदीर या मार्गाने पांडवा कपेल येथे ही मिरवणूक येणार आहे. त्यानंतर सिने विशांतमार्गे ती लोहिया मैदानाजवळ येऊन लोहिया मैदानावर सांगता होणार आहे.कार्निव्हल मार्गा विरोधात याचिकाकार्निव्हलची मिरवणूक रवींद्र भवन मार्गे न नेता पूर्वीप्रमाणो होली स्पिरीटमार्गे आणण्याचा सरकारने जो निर्णय घ्यायचा ठरविला आहे त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सुनावणी होणार आहे. मडगावातील कार्निव्हलची मिरवणूक 23 फेब्रुवारीला आयोजीत करण्यात आली आहे.
मुरीडा फातोर्डा येथील किस्तोदियो डायस यांनी ही याचिका दाखल केली असून मंगळवारी ती दाखलही करुन घेण्यात आली. यासंबंधी संबंधितांना न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वी या मार्गाला विरोध करणारे एक पत्रही मुंबई उच्च न्यायालयात पाठविण्यात आले होते. ज्या मार्गावरुन ही मिरवणूक काढण्याचे ठरविले आहे त्या मार्गावर हॉस्पिसियोसह अन्य चार इस्पितळे असून या इस्पितळाकडे जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने हा मार्ग मिरवणुकीसाठी बंद केल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णांसाठी ते धोकादायक ठरु शकते याकडे या याचिकेत लक्ष वेधले आहे. यापूर्वी पोलिसांनीही याच कारणावरुन या मार्गाला विरोध केला होता याकडेही या याचिकेत लक्ष वेधले आहे.