गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जातील - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 08:27 PM2019-06-10T20:27:15+5:302019-06-10T20:28:43+5:30
आम्ही गोमंतकीयांना चांगले मासेच देत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पणजी - गोमंतकीयांसाठी सुरक्षितच मासे उपलब्ध केले जात आहेत. तपास नाक्यांवर मासळी तपासली जाते आणि बाजारपेठेतही मासे अन्न व औषध प्रशासन खाते (एफडीए) तपासत असते. आम्ही गोमंतकीयांना चांगले मासेच देत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आल्तिनो येथील बंगल्यावर मच्छीमार खात्याची व अन्न व औषध प्रशासन खात्याची बैठक घेतली. मंत्री विनोद पालयेकर तसेच एफडीएच्या संचालकांचीही यावेळी उपस्थिती होती. माशांमध्ये अजून फॉर्मेलिन आढळते असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते. त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की आपण स्थितीचा आढावा घेतला आहे. माशांमध्ये फॉर्मेलिन नाही. कुणीच माशांविषयी राजकारण करू नये. जर माशांमध्ये फॉर्मेलिन आहे असे कुणाला वाटले तर ते मासे नेऊन अन्न व औषध प्रशासन खात्याच्या यंत्रणोकडे द्या. यंत्रणोकडून तपासणी करून घ्या.
मुख्यमंत्री म्हणाले, की गेल्या 1 जून रोजी मासेमारी बंदी लागू झाली. बाहेरून माशांची आयात होते पण गेले दहा दिवस रोज तपास नाक्यांवर माशांची तपासणी केली जाते. तसेच बाजारपेठेतही माशांची तपासणी होते. काही मासे फिश मिलसाठी आणले जातात. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही हे देखील पोलिसांकडून पाहिले जाते. माशांबाबत कुणीच गोमंतकीयांमध्ये भीती निर्माण करू नये. यापूर्वीही बरीच भीती निर्माण केली गेली होती.
मुख्यमंत्री म्हणाले, की क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया ह्या तिस:या यंत्रणोकडूनही माशांची तपासणी केली जाईल. त्याविषयीची फाईल आपण येत्या दोन दिवसांत मंजुर करीन. गोमंतकीयांना असुरक्षित मासे आम्ही देत नाही. माशांच्या दर्जाविषयी आम्ही दक्ष आहोत.