छायाचित्रकार पाठवून आमच्या संघावर पाळत ठेवली; मुंबई सिटी एफसीविरोधात एफसी गोवाची तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 08:19 PM2024-02-27T20:19:14+5:302024-02-27T20:19:32+5:30

आजचा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

sent photographers to monitor our team complaint by fc goa against mumbai city fc | छायाचित्रकार पाठवून आमच्या संघावर पाळत ठेवली; मुंबई सिटी एफसीविरोधात एफसी गोवाची तक्रार 

छायाचित्रकार पाठवून आमच्या संघावर पाळत ठेवली; मुंबई सिटी एफसीविरोधात एफसी गोवाची तक्रार 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : इंडियन सुपर लीगमध्ये गतविजेत्या मुंबई सिटी एफसी संघाकडून आपल्याविरोधात पाळत ठेवली गेली असल्याची तक्रार एफसी गोवा संघाने आयोजकांकडे दाखल केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आज, बुधवारी मुंबई फुटबॉल एरिना येथे होणाऱ्या या दोन संघातील नियोजित सामन्यापूर्वी हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे आजचा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत सुरू असलेल्या आपल्या प्रशिक्षण सराव सत्रादरम्यान मुंबई सिटी एफसीने मंगळवारी प्रशिक्षण तयारीची हेरगिरी करण्यासाठी एका छायाचित्रकाराला पाठवले, असा आरोप एफसी गोवाने केला आहे. याबाबत  त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबई सिटी एफसीचे विश्लेषक मुंबईत गोवा संघाच्या प्रशिक्षण सराव सत्रात दिसले होते. विश्लेषकाने प्रशिक्षणाशी संबंधित फूटेज रेकॉर्ड केले आहे, असे एफसी गोवाने अहवालात नमुद केले आहे.

मंगळवारच्या पत्रकार परीषदेत या घटनेचा उल्लेख करत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी नाराजी व्यक्त केली. मार्केझ यांना पत्रकारांनी संघाचा खेळाडू बोर्जा हेरेरा याच्या दुखापतीबद्दल विचारले असता, ‘ते आमच्यापेक्षा मुंबई सीटी एफसीच्या फोटोग्राफरला जास्त माहीत असेल. मुंबई सिटी एफसीच्या फोटोग्राफरने आमच्या प्रशिक्षण सत्राचे संपूर्ण रेकॉर्डिंग केले आहे. त्यामुळे बोर्जा प्रशिक्षण घेत आहे की नाही, किंवा तो उद्या खेळणार आहे की नाही, हे त्या फोटोग्राफरला जास्त माहीत असेल’ असे उत्तर देत मार्केझ यांनी आपली खदखद व्यक्त केली. 

मार्केझ यांच्या या विधानानंतर फुटबॉल क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. लीगच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. निष्कर्षांच्या आधारे योग्य कारवाई करू, असे एफसी गोवाला कळविले आहे. मात्र या वादामुळे एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील आगामी सामन्यात खेळाडूंमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: sent photographers to monitor our team complaint by fc goa against mumbai city fc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा