सडेतोड बोलतो म्हणून खुशाल काढून टाका, पक्षापेक्षा देश मोठा - शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 01:57 PM2018-05-11T13:57:00+5:302018-05-11T13:57:00+5:30
माझ्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा, असे नमूद करुन भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष काही चुकीचे करीत असेल तर आवाज उठवित राहीन, असा इशारा दिला.
पणजी - माझ्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा, असे नमूद करुन भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष काही चुकीचे करीत असेल तर आवाज उठवित राहीन, असा इशारा दिला. एका व्याख्यानानिमित्त ते गोव्यात आले असता निवडक निमंत्रितांनी त्यांच्याशी संवाद साधला. दोनापॉल येथे इंटरनॅशनल सेंटरमध्ये वार्तालापाचा हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले की, ''भाजपा पूर्वीसारखा राहिलेला नाही. हे सरकार भाजपाचे नव्हे तर मोदींचे वाटावे, अशी स्थिती आहे. शेतकरी, सर्वसामान्य लोक या सरकारबद्दल समाधानी नाहीत. पक्षाने जाहीरनाम्यांमधून दिलेल्या आश्वासनांची, ध्येय धोरणांची नेत्यांना कोणीतरी आठवण करुन द्यायला हवी ते काम आम्ही करतोय. सडेतोड बोलतो त्यामुळे जास्तीत जास्त पक्षातून काढून टाकतील, त्यापेक्षा माझे कोणी काही वाकडे करु शकणार नाही''.
‘गोवा आता बराच सुधारला आहे. एवढी वर्षे मी गोव्याला यायचो तेव्हा फिरताना वाहतुकीची कोंडी कधी जाणवली नाही. परंतु या खेपेला मात्र वाहतुकीत अडकून पडलो. गोव्याला लहान राज्य म्हणू नका. छोटे राज्य असले तरी सर्व बाबतीत हे राज्य सुधारलेले आहे आणि देशाच्या प्रगतीमध्येही महत्त्वाचे योगदान देत आहे,’असे शत्रुघ्न म्हणाले.
वार्तालापाच्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास त्यांना थोडा विलंब झाला. दरम्यान, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंच या संघटनेत राज्यातील समविचारी लोकांनी अधिकाधिक सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी गोमंतकीयांना केले आहे.