लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कळसा, भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी, तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी हातमिळवणी करण्यासाठी गेले होते. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष गोव्यातील जनतेचा विश्वासघात करीत आले आहेत. आता कळसा, भांडुरा प्रकल्पासाठी सिद्धरामय्या मोदी भेट ही गोवेकरांच्या सर्वनाशासाठीच असल्याची टीका आरजी पक्षाने पत्रकार परिषदेत केली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपने आपण म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवू देणार नसल्याचे सांगत मोठा गाजावाजा केला होता. त्यांनी सुरू केलेल्या म्हादई बचाव आंदोलनाला आरजी पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे बिनबुडाचे आरोप लावण्यात आले. आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे म्हादई पाण्यासाठी धाव घेतली आहे.
आज राज्यात मोठे संकट उभे राहिलेले असताना राज्यातील काँग्रेस सरकार गप्प आहे. आमदार युरी आलेमाव हे कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाला जाब विचारण्याऐवजी भाजपला ट्रिटद्वारे प्रश्न विचारतात, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जनतेची केली जातेय दिशाभूल : परब
मनोज परब म्हणाले, दोन्ही पक्ष म्हादईविषयी गंभीर नसून फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी गोव्यातील जनतेची दिशाभूल तसेच त्यांच्या भावनेशी खेळ खेळत आले आहेत. आम्ही म्हादई वाचविण्यासाठी हर एक प्रयल करू. आमचा आमदार येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा हा विषय उचलून धरणार आहे. आज गोव्यातील तमाम जनतेने विचार करण्याची गरज आहे. गोवा आणि गोवेकरांचा विषय फक्त रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षच उचलून धरत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोवेकरांनी आरजी पक्षाला कॉल दिल्यास गोवा गोवेकरांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणार आणि आमचे अस्तित्व कुठे तरी राखले गेले जाणार असल्याचे परब म्हणाले.