काशिराम म्हांबरे, म्हापसा: अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या सतत वाहतुकीची वर्दळ सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पेडे येथील या धोकादायक जंक्शनवर आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ६ वाहनात अपघात घडला. यात ३ ट्रक तसेच ३ दुचाकींचा समावेश होता. या अपघातातील दोन दुचाकी ट्रकखाली आल्याने चिरडल्या गेल्या. त्यात दोन मुलांसह ४ जण जखमी झालेआहेत. जखमींना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेतून जिवीतहानी मात्र झाली नाही. मात्र झालेल्या अपघातातून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात भर म्हणून ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला.
एकूण ८ रस्ते मिळून तयार झालेल्या या जंक्शनवर दर दिवशी लहान मोठे अपघात सतत घडत असतात. होत असलेल्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लाय ओवरची मागणी सुद्धा स्थानीकांकडून करण्यात आलेली. मात्र त्यावर प्रशासनाकडून आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. सरकारी पातळीवर अनेक वेळा जंक्शनची पाहणी सुद्धा करण्यात आलेली पण त्यातून काहिच निष्पन्न होऊ शकले नाही. तसेच जंक्शनवर सिग्नलही बसवण्यात आले नाही. त्यामुळे सततचे अपघात घडत असतात.
अपघातग्रस्तातील एक ट्रक करासवाडावरून पर्वरीच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान जंक्शनवर पाण्याचा टँकर वळण घेत असताना हा अपघात घडला. त्यानंतर त्या ट्रक चालकानेतेथील जंक्शनवर असलेल्या दुचाकी चालकांना तसेच तिसºया ट्रकला धडक दिली. त्यात दुचाकी ट्रकच्या खाली आल्या. दुचाकी चालक सुदैवाने बचावले. जंक्शनवर वाहतुक पोलीस नसतात अशी माहिती स्थानीकांनी देऊन सरकारच्या दुर्लक्षामुळे अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आला. जंक्शनवर मोठी दुर्घटना होण्यापूर्वी सरकारने लक्ष पुरवावे असेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.