पणजी: पर्यटकांना वाहतूक नियम पाळावेच लागतील. जर रेंट अ कार किंवा बाईकचा अपघात होऊन जर त्यात कुणाचा मृत्यू झाला तर चालकासह कार मालकालाही जबाबदार धरुन त्यालाही अटक करुन तुरुंगात पाठवले जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
दसऱ्या निमित कदंब महामंडळाकडून आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. मद्यपान करुन वाहन चालवणे, बशिस्तपणे वाहन चालवणे हे कुठल्याही खपवून घेतले जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना हे पाहण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओ ने कारवाई करावी त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यात वाहतूकीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासाची वेळ कमी होत आहे. मात्र पायाभूतसुविधा वाढत असतानाच अपघातही वाढत आहेत. लोक वेगाने वाहने चालवत असल्याने दुचाकी चालकांचे नाहक बळी जात आहे. हे थांबायला हवे. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल. मद्यपान करुन वाहन चालवणे खपवून घेतले जाणार नाही.पर्यटकांनी सुध्दा वाहतूक शिस्त पाळावी. यापुढे रेंट अ कार किंवा बाईकचा अपघात होऊन जर त्यात कुणाचा मृत्यू झाला तर चालकासह कार मालकालाही जबाबदार धरले जाईल. त्यालाही तुरुंगात पाठवण्याची तरतूद करण्यावर सरकारचा विचार आहे, त्यांनी स्पष्ट केले.