सद्गुरू पाटील-पणजी : सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींच्या यादीची छाननी करण्याची प्रक्रिया आता सरकारच्या समाज कल्याण खात्याने अधिक गतिमान केली आहे. मृत्यू झालेले, स्थलांतर केलेले, संशयास्पद अशा लाभार्थींना यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिण गोव्यातील १२ हजार लाभार्थींना नोटिसा जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संपूर्ण गोव्यातील आतापर्यंत सुमारे १० हजार व्यक्तींचे अर्थसाहाय्य थांबविण्यात आले आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांमधील सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींचे सरकारने सर्वेक्षण केले आहे. नियोजन व सांख्यिकी खात्याने यापूर्वी सखोल अभ्यास करून घेऊन अहवाल समाज कल्याण खात्याला दिला आहे. त्या अहवालांच्या आधारे टप्प्याटप्प्याने बोगस लाभार्थी, मृत्यू झालेले, स्थलांतर केलेले, असे लाभार्थी शोधून काढून त्यांना नोटीस पाठविण्याच्या कामास शासकीय यंत्रणेने वेग दिला आहे. दक्षिण गोव्यातील सर्व लाभार्थींची छाननी करून एकूण १२ हजार नावे वेगळी काढण्यात आली. त्या बारा हजार लाभार्थींना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. मृत्यू झाला, तरी लाभार्थीच्या नावे दरमहा बँकेत प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होत आहेत. स्थलांतर करून मजूर गेले, तरी त्यांच्याही नावे बँकेत रक्कम जमा होत आहे. अनेक लाभार्थी प्रत्यक्ष आहेत कुठे, तेही सापडत नाहीत. अशा सर्व संशयास्पद लाभार्थींना नोटिसा जाऊ लागल्या आहेत. बारा हजारपैकी सासष्टी तालुक्यात जास्त लाभार्थी संशयास्पद आहेत. १८७ लाभार्थी एचआयव्हीबाधित सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांची एकूण संख्या आता १ लाख ३५ हजार झाली आहे. या योजनेवर सरकारचा सर्वाधिक खर्च होतो. वयाची साठ वर्षे पार पडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या जे निराधार असतात, त्यांच्यासाठी ही योजना सुरू झाली होती. हजारो ज्येष्ठ व्यक्तींना व विधवांना या योजनेमुळे दिलासा मिळाला. मात्र, दुसऱ्या बाजूने गेल्या दहा वर्षांत विविध मंत्री व आमदारांच्या हस्तक्षेपामुळे मजूर व धनिकांमधीलही व्यक्ती लाभार्थी म्हणून घुसल्या. त्यांना आता बाजूला केले जात आहे. सध्या १८७ एचआयव्हीबाधित व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असून त्यांच्यासाठी मात्र ही योजना एक वरदानच आहे. एचआयव्हीबाधित लाभार्थींमध्ये १२६ पुरुष आणि ६१ महिला आहेत.
सामाजिक सुरक्षा योजनेला ‘चाळण’
By admin | Published: September 19, 2014 1:40 AM