मासेमारी ट्रोलरवर बसणार सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल; वीजमंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती
By पंकज शेट्ये | Published: March 1, 2024 10:49 PM2024-03-01T22:49:20+5:302024-03-01T22:52:43+5:30
गोव्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ना हरकत दाखला दिल्यानंतर पॅनल बसवण्याच्या कामाला होईल सुरुवात
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: अधिक प्रमाणात सौर उर्जा निर्माण व्हावी यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केली असून त्या अंतर्गत गोव्यातील मासेमारी ट्रोलरवर सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल (सोलर पॅनल) बसवण्यात येणार आहेत. गोव्यातील मासेमारी ट्रोलरवर सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल बसवण्याकरीता गोव्याच्या मत्स्यव्यवसाय विभागशी ना हरकत दाखला मागितलेला असून तो मिळाल्यानंतर लवकरच सर्व ट्रोलरवर पॅनल बसवण्याच्या कामाला सुरवात होणार असल्याची माहीती वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली.
शुक्रवारी (दि.१) संध्याकाळी विकसीत भारत अंतर्गत कुठ्ठाळी मतदारसंघात आयोजित केलेल्या पंचायत चलो अभियान कार्यक्रमात वीजमंत्री सुदीन ढवळीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत. तसेच त्यांच्याबरोबर कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, कुठ्ठाळी जिल्हा पंचायत सदस्या मेरसियाना वास आणि इतर पदाधिकारी तसेच कुठ्ठाळीतील मतदार उपस्थित होते. कुठ्ठाळी मतदारसंघात पाच पंचायती असून त्या कार्यक्रमात मंत्री सुदीन ढवळीकर यांनी सर्व पंचायतीतील मतदारांच्या विविध समस्या एकल्यानंतर त्यांच्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना कुठ्ठाळीतील अनेक मतदारांनी माझ्यासमोर विविझ समस्या माडल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. वेळसांव पंचायतीतील काही लोकांनी रेल्वे दुपदरीकरणाशी जुळलेल्या काही समस्येबरोबरच अन्य समस्या मांडल्या. साकवाळ इत्यादी पंचायतीतील मतदारांनी पाणी पुरवठा समस्येबरोबरच वीज पुरवठा समस्या आणि अन्य समस्या मांडून त्यांच्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. कुठ्ठाळीतील मतदारांच्या समस्या त्वरित दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना उचित पावले उचलण्याबाबत कळवण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमावेळी सौर उर्जेबाबत माहीती देण्यात आल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. कुठ्ठाळीतील लोकांनी घरांच्या छप्परावर सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल बसवल्यास त्यांना काय फायदे होईल त्याबाबत माहीती देण्यात आली. गोवा सरकारने मासेमारी ट्रोलरवर सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल बसवण्यासाठी नवीन योजना आखली आहे. गोव्याच्या सर्व मासेमारी ट्रोलरवर सौर उर्जा निर्माण करणारे पॅनल बसवण्यासाठी गोव्याच्या मत्स्यव्यवसाय विभागशी ना हरकत दाखला मागितलेला आहे. तो मिळाल्यानंतर त्वरित पॅनल बसवण्याच्या कामाला सुरवात होणार असल्याची माहीती ढवळीकर यांनी दिली. कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांनी मंत्री सुदीन ढवळीकर यांनी कुठ्ठाळीत चलो पंचायत अभियानात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. मंत्री ढवळीकर यांनी कार्यक्रमाद्वारे लोकांच्या समस्या ऐकून त्या दूर करण्याचे आश्वासन दिले असून ते त्यांचे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करणार असा विश्वास वास यांनी व्यक्त केला.