लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दक्षिण गोव्याचा भाजप उमेदवार लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच घोषित केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच उमेदवार शक्य तेवढ्या लवकर जाहीर केला जावा, अशी विनंती आम्ही केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
उत्तर गोवा मतदारसंघात उमेदवार कोण? याबाबत कोणतेच सस्पेंस राहिलेले नाही. केवळ उमेदवाराचे नाव जाहीर होण्याचे सोपस्कार तेवढे बाकी आहेत. दक्षिण गोवा मतदारसंघातून पाच नावे दिल्लीला पाठवली असून पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ दिल्लीहूनच उमेदवार जाहीर करील. दक्षिण गोव्यात यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे हेच आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे उमेदवारी देताना निवडून येणे, हाच प्रमुख निकष असेल.
पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याला निवडून आणणे मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. गोव्यात विरोधकांच्या 'इंडिया अलायन्स'बद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, वन टू वन लढत वगैरे काही नाही. विरोधी पक्षांमध्ये एकमेकांचे नेते कोण याचाच पत्ता नाही.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने याआधी दिलेले आहे. दक्षिण गोव्यात दिगंबर, तवडकर यांच्यासह माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर व दामू नाईक यांचीही नावे यादीत आहेत.
इच्छा असो-नसो, पक्षादेश पाळावाच लागेल...
मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वेक्षणातून तसेच पदाधिकारी व इतरांनी सुचवल्यानुसार पाच नावे पुढे आलेली आहेत. कोअर कमिटीने से या नावांवर चर्चाही केलेली असून ती है ती केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली आहेत. दोघांनी नकार दिल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, कोणाचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असो अगर नको. पक्ष नेतृत्त्वाकडून जे आदेश येतील त्याचे पालन करावेच लागेल. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे निर्णय पक्ष घेतो ते आम्हा सर्वावर बंधनकारक असतात. भाजपात देश प्रथम, पक्ष व्दितीय आणि आम्ही तृतीय आहोत.