लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात काल, शनिवारी अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे प्रचंड वाढलेल्या उष्म्यापासून गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे.
सत्तरी, डिचोली, बार्देश, तिसवाडी, मुरगाव, पेडणे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यात पावसाच्या सरी कोसळणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वास्को, मडगाव, सांगे, धारबांदोडा, जुने गोवे, पणजी, म्हापसा आणि सत्तरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. इतर ठिकाणीही पाऊस पडणार असल्याचे संकेत होते.
वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी पडझडीच्याही घटना आहेत. अग्निशामक दलाला विविध भागांतून मदतीसाठी १०० हून अधिक कॉल्स आले होते. मागील काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत होते. वेधशाळेतील रडारद्वारे टिपण्यात आलेल्या आकाशाच्या छायाचित्रात पावसाचे ढग निर्माण होण्याची प्रक्रिया होत असल्याचे आढळून आले होते.
ही प्रक्रिया गतिमान होऊन पुढील चार दिवसांत त्याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. विशेषतः गोवा आणि कोंकण भागात पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुरगाव तालुक्यालाही झोडपले. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पुर्ववत झाला नव्हता. पावसामुळे मुंडवेल-वास्को येथील वीज वाहिनीवर माड कोसळले. त्याचबरोबर सत्तरी, वाळपई परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचीतारांबळ उडाली.
शनिवारी पणजीत कमाल ३४.४ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर मुरगाव येथील कमाल तापमान ३४ अंश व किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असे राहिले. पुढील ४८ तासात कमाल तापमानात घट होईल असा अंदाज आहे. गोव्यात तापला तरी अधिकत प्रमाणात सापेक्षिक आर्द्रतेमुळे उष्याचा त्रास अधिक होत आहे. राज्यात १२ ते १७ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
आज, उद्या वादळवारे
रविवारी आणि सोमवारी गोव्यात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी दोन दिवस पिवळा अलर्टही जारी करण्यात आला आहे. १४ ते १७ मे दरम्यानही या पावसाच्या सरी कोसळणे चालू राहील, असेही अंदाजात म्हटले आहे.