लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाच्या प्रारंभाला रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्र्यांनी या उद्घाटनाला खास उपस्थिती लावून कलाकारांचे कौतुक केले व त्यांना मानचिन्ह दिले. यावेळी या चित्रपटातील दिग्दर्शक तसेच कलाकार सर्वच उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, प्रतिभावान असे दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शित केलेला आणि सादर केलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा प्रेरणादायी चित्रपट हा ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इंडियन पॅनोरमाच्या प्रारंभाचा भाग बनला, याचा मला आनंद होत आहे. इंडियन पॅनोरमा चित्रपट रसिकांना आणि गोमंतकीयांना भारतीय कथा कथनाची समृद्धता अनुभवण्याची एक उल्लेखनीय संधी देते, ज्यात आपला सांस्कृतिक वारसा साजरा करणाऱ्या कोंकणी चित्रपटांच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या कार्याच्या आधारे हा चित्रपट आताच्या पिढीला योग्य अशी माहिती देण्यात लाभदायक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
दिग्दर्शक रणदीप हुड्डा म्हणाले, स्वातंत्र्य वीर सावरकर हे देशातील एक महान असे क्रांतीकारक होते. त्याचे योगदान हे आताच्या पिढीला कळावे यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. आमच्या स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे, पण त्याची पूर्ण अशी माहिती काही लोकांना नसते. या चित्रपटातून स्वातंत्र्यावीर सावरकरांचे योगदान मांडले आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी चांगले काम केले आहे.