सेंट झेवियर शवप्रदर्शनाला प्रारंभ; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 01:04 PM2024-11-22T13:04:11+5:302024-11-22T13:05:04+5:30
हजारो भाविकांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरचे पवित्र अवशेष दर्शन घेतले.
यावेळी शवप्रदर्शन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील तसेच देश-विदेशातील भाविक आले आहेत. हा पवित्र अवशेष दर्शन सोहळा पुढील ४५ दिवस चालणार आहे. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याला हा जगाला एक एकात्मतेचा संदेश देणारा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभराप्रमाणे देश-विदेशातील विविध धर्माचे लोक एकत्र येतात. गोव्यासारख्या राज्यात सर्वधर्मसमभाव जपला जात आहे. यात राज्यातील अन्य धर्माचे लोकही असणार आहेत. पंतप्रधान जगभरात एकात्मतेचा संदेश देत असतात. भारत हा सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे. जुने गोवे हे जगाचे वारसास्थळ आहे. आता या महोत्सवात आणखी लोकांची भर पडणार आहे.
जुने गोवे येथील सेंट झेवियर शवप्रदर्शन सोहळा पुढील ४५ दिवस होणार आहे. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. गोवा हे सर्व धर्मांचा आदर करणारे राज्य आहे. मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, 'जुने गोवे येथील सेंट झेवियर शवप्रदर्शन सोहळ्यानिमित्त जगभरातील लोक एकत्र येत असतात. तसेच एकत्र येऊन प्रेमाने आदर तसेच एकतेचा संदेश देत असतो. ही आमची सर्वात मोठी एकता आहे.
या सोहळ्याला येणाऱ्या भाविकांचा आदर करणे आमची जबाबदारी आहे. त्यामुळे हा सोहळा देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना योग्य तो मान देत साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी स्वयंसेवकांसह पोलिस मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. तसेच पार्किंग व्यवस्थेचेही योग्य नियोजन केले आहे. यंदाचा सोहळा लक्षणीय ठरण्यासाठी सर्वांनी नियोजन केले आहे.