लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'विकसित भारत' यात्रेत भाजपचा प्रचार करून आचारसंहितेचा भंग केला जात आहे, असा आरोप करत प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यात्रेला आयोगाने दिलेली परवानगी तत्काळ मागे न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार कार्ल्स फेरेरा, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकॉस्टा व खासदार फ्रान्सिस सार्दिन उपस्थित होते. विकसित यात्रेसंदर्भात आचारसंहिता भंगाच्या तक्रारीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
आमदार कार्ल्स फेरेरा म्हणाले की, 'विकसित भारत' यात्रा केंद्र सरकारच्या निधीतून चालू आहे. सरकारी यंत्रणेचा यासाठी गैरवापर केला जात आहे. सरकारी कार्यक्रमांमधून भाजपप्रवेश दिला जात आहे. कार्यकर्ते भाजपचा भगवा स्कार्फ घालून या कार्यक्रमात सहभागी होतात. त्यामुळे भाजपचा प्रचार होत आहे. आचारसंहिता भंगाचा प्रकार उघडपणे चालू आहे.
विकसित भारत यात्रेला आयोगाने परवानगी दिल्याचे सांगण्यात येते. ही परवानगी जर आयोगाने मागे घेतली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. पाटकर यांनी असा दावा केला की, इंटेलिजन्स सव्र्व्हेनुसार भाजपचा दक्षिण गोव्यात पराभव निश्चित आहे. उत्तर गोव्यातही जिंकण्याची शाश्वती नसल्याने भाजपात नैराश्य आहे.
दक्षिण गोव्यात भाजपला उमेदवार मिळत नाही. चार नावे पाठवली त्यातील दोघांनी माघार घेतली. त्यानंतर महिला उमेद- वाराचा शोध घेऊनही झाला. आता 'कमळ' निशाणी हाच आमचा उमेदवार असल्याचे भाजप म्हणत असल्याचा टोलाही पाटकर यांनी लगावला.
काँग्रेस उमेदवार आज-उद्या
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज किंवा उद्या दिल्लीत होणार असून त्या बैठकीत दोन्ही उमेदवार निश्चित होतील, असे पाटकर यांनी सांगितले. उमेदवारीच्या बाबतीत काँग्रेसमध्ये कोणताही गोंधळ नाही किंवा आम्ही गडबडलोही नाही. फिल्डवर आमचे प्रत्यक्ष काम चालूच आहे. दोन्ही जागांवर गोमंतकीयांना हवे तसे योग्य उमेदवारच काँग्रेस देईल.