पणजी : गोव्यात येत्या 21 जानेवारीपासून पाच शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे विधानसभा अधिवेशन भरविले जाणार आहे. विधानसभा कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांकडून सादर केले जाईल. गोव्यातील युवकांना त्यापासून प्रेरणा मिळावी असा यामागील हेतू आहे, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.
सभापती म्हणाले, की एरव्ही दरवर्षी विद्यार्थी विधानसभा ही पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पातील एका जागेत घेतली जात होती. केवळ एकाच ठिकाणी पर्वरीत विद्यार्थी विधानसभा व्हायची. आता पणजीसह साखळी, फोंडा, मडगाव, वास्को अशा ठिकाणी विद्यार्थी विधानसभा होतील. गोवा विधिकार मंचाची नुकतीच बैठक झाली व त्यावेळीही याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. माजी आमदार मोहन आमशेकर हे यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. विविध शहरांमध्ये रवींद्र भवन, राजीव कला मंदिर अशा जागा कधी उपलब्ध आहेत हे आमशेकर पाहतील व त्यानुसार कार्यक्रम निश्चित करतील.
सभापती म्हणाले, की विधानसभा प्रकल्पात चालणारे खरेखुरे विधानसभा कामकाज हे अवघ्याच विद्यार्थ्यांना व युवकांना पाहायला मिळते. विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांकडून कामकाजाचे सादरीकरण झाल्यानंतर ते सादरीकरण गोव्यातील किमान पाच हजार तरी युवकांना पाहायला मिळावे, असे अपेक्षित आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर बिगरविद्यार्थी युवक देखील सादरीकरणामध्ये भाग घेऊ शकतात. हे कामकाज पाहून युवकांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळेल. विविध शहरांमधील युवकांना सादरीकरणाचा लाभ मिळेल.
दरम्यान, गोव्याचे विधानसभा अधिवेशन येत्या 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. गोवा महसूल संहिता दुरुस्ती, गोवा नगर नियोजन कायदा दुरुस्ती तसेच गोवा कृषी उत्पादन व मार्केटिंग विधेयक ह्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. अजून एकाही विधेयकाचा मसुदा विधिमंडळ खात्याला सादर झालेला नाही. 14 रोजी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. शुक्रवारी खासगी कामकाजाचा दिवस असेल व त्या दिवशी एकूण चार खासगी ठराव सादर केले जातील, असे सभापतींनी सांगितले. विधानसभा अधिवेशनानिमित्त सध्या तयारी सुरू आहे.