मांडवीत सागरी विमानाची यशस्वी चाचणी
By admin | Published: May 24, 2015 01:21 AM2015-05-24T01:21:13+5:302015-05-24T01:21:22+5:30
पणजी : गोवा पर्यटनविभागाद्वारे पाण्यात उतरणाऱ्या नऊ आसनी समुद्री विमानाची शनिवारी मांडवी नदीच्या पात्रात यशस्वी चाचणी करण्यात आली.
पणजी : गोवा पर्यटनविभागाद्वारे पाण्यात उतरणाऱ्या नऊ आसनी समुद्री विमानाची शनिवारी मांडवी नदीच्या पात्रात यशस्वी चाचणी करण्यात आली. कुतूहल आणि उत्साही वातावरणात सागरी विमान मांडवी नदीत उतरले. महाराष्ट्रानंतर गोव्यात अशा प्रकारची सेवा पर्यटकांसाठी आता सुरू होणार आहे.
या विमानाने दाबोळी विमानतळ ते मांडवी जेटीपर्यंत प्रवास केला. गोवा पर्यटनाद्वारे मारिटाइम एनर्जी
हेली एअर सर्व्हिसेस प्रा.लि.(मेहेर) यांच्याबरोबर समुद्री विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१२ मध्ये करार केला होता. समुद्री विमान उडविण्यासाठी दोनापावल, कोको बिच, (नेरुळ) मिरामार, शापोरा आणि मांडवी नदी यांसारख्या विविध ठिकाणांची चाचपणी सुरू होती.
विमानाची समुद्रात यशस्वी चाचणी होताच पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व आमदार नीलेश काब्राल यांनी दोन वर्षांची घेतलेली मेहनत फळाला आली, अशी प्रतिक्रिया दिली. पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी सांगितले की, पर्यटन खात्याद्वारे गोव्यात पर्यटकांची संख्या वाढावी त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पाण्यावर चालणारी बस, हॉट एअर बलून या प्रकल्पांनंतर आता समुद्री विमानाला यात समाविष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे. या सेवेचा प्रारंभ आॅगस्टच्या मध्यंतरी होणार आहे. सध्या नऊ आसनी विमान आहे. त्यामुळे याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला, तर भविष्यात सोळा सीटर समुद्री विमान बनविण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. शिवाय लोकांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्गही वाढविण्यात येतील. दरम्यान, विमान चाचणीवेळी अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी मच्छीमारी खाते, बंदर कप्तान आणि किनारी पोलिसांच्या मदतीने अंतर्गत जलवाहतूक, मच्छीमारी, जलक्रीडा हे काही वेळासाठी रोखले होते. विमानाच्या यशस्वी चाचणीनंतर पुन्हा मच्छीमारी बोटींना समुद्रात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली.(प्रतिनिधी)