दहा तासांच्या प्रवासात शब्दही बोलली नाही; फक्त खिडकीतून बाहेर पाहायची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2024 08:15 AM2024-01-13T08:15:32+5:302024-01-13T08:16:16+5:30
चालक रेजॉन डिसोझा याची प्रसार माध्यमांना माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : थंड डोक्याने आपल्या चार वर्षीय मुलाची हत्या केलेल्या सूचनाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मुलाचा मृतदेह बॅगेत कोंबून टॅक्सीने बंगळुरुला निघालेली सूचना दहा तासांच्या प्रवासात निःशब्द होती. फक्त खिडकीतून एकटक बाहेर पहायची, असे चालक रेजॉन डिसोझा याने प्रसार माध्यमांकडे बोलताना सांगितले.
सूचना ही संवेनदनाशून्य बनली होती. बंगळुरुला जाताना वाटेत तिने ब्रेकफास्टही घेतला. तेव्हादेखील तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसले नाहीत, असे चालकाने सांगितले. रेजॉन याच्या सजगतेमुळे तसेच त्याने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली.
बंगळुरुला जाताना वाटेत चोर्ला येथे वाहतूक कोंडीमुळे सुमारे पाच तास टॅक्सी अडकली. वाहतूक पाच ते सहा तास सुरळीत होणार नाही, अशी कल्पना आपण सूचना हिला दिली व हवे तर माघारी फिरून मोपा किंवा दाबोळी विमानतळावर सोडतो, असेही सांगितले. परंतु तिने ऐकले नाही. आपल्याला बंगळुरुपर्यंत टॅक्सीनेच प्रवास करायचा आहे, असे तिने चालकाला सांगितले.
पतीसोबतच्या ताणलेल्या सबंधांबाबत 'तिने' टिश्यू पेपरवर केली नोंद
चार वर्षीय मुलाची हत्या करणारी निर्दयी सीईओ माता सूचना सेठ हिच्या सामानातून पोलिसांना टिश्यू पेपर आढळला, ज्यावर तिने पतीसोबतच्या ताणलेल्या संबंधांबाबत आयलायनरने मजकूर लिहिल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी या चिठ्ठीचा नेमका मजकूर उघड केला नसला तरी, सूत्रांचे म्हणणे आहे की संशयित सूचना हिने आपल्या विभक्त पतीसोबतच्या ताणलेल्या संबंधांबद्दल लिहिले आहे. आयलाइनरने त्यावर लिहिले असून हस्ताक्षर तज्ञांद्वारे ही चिठ्ठी तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवण्यात आली आहे. चिठ्ठीतून ती तिचे पती व्यंकट रमणसोबतच्या ताणलेल्या नातेसंबंध आणि रमणला मुलाला भेटण्याची परवानगी दिल्याने न्यायालयाच्या आदेशावर नाखुश होती हे सूचित होते.