'राजभाषा व्हायला आधी मराठी जगली तर पाहिजे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:56 PM2018-04-16T21:56:28+5:302018-04-16T21:56:28+5:30
मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे
पणजी: मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा असे संदेश गोवा मराठी अकादमीला काहीजण पाठवतात. राजभाषा होणे ही वेगळी व नंतरची गोष्ट आहे. सध्या मराठीला वाचविण्याचे कार्य पुढे नेणे गरजेचे आहे. मराठी वाचली तरच ती राजभाषा होईल, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे असे निरीक्षण मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी नोंदविले. तरूणांची नस समजून घेऊन त्यांना मराठीकडे वळविणे व त्यांना व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात, गोमंतक साहित्य सेवक मंडळ व मिनेझीस ब्रागांझा संस्थतर्फे आयोजित केलेल्या जेष्ठ समिक्षकत सोमनाथ कोमरपंत यांच्या गोमंतक: प्रज्ञा आणि प्रतिभा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर लेखक प्रा. नारायण महाले, जेष्ठ पत्रकार परेश प्रभू, डॉ. सोमनाथ कोमरपंत, मिनेझीस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर उपस्थित होते.
मराठी राजभाषा होण्याकरिता आधी राजकर्त्यांच्या मनात मराठी विषयी प्रेम असले पाहिजे व हे प्रेम प्रजेच्या वतीने निर्माणजाले पाहिजे. सध्या मराठी प्रथामीक शाळाच जर बंद पडत आहेत तर त्यात मराठी करी संरक्षित राहणार असा प्रश्न निर्माण झाला असून पालकांचे प्रबोधन आदी कामे सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. मराठीला पोर्तुगीजांनी संपविण्याचे षडयंत्र रचले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आपलीच माणसे मराठी संपविण्याचे प्रयत्न करत असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले.