‘ओखी’चा स्विमथॉनला फटका; ७०० स्विमर्सची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 11:21 AM2017-12-03T11:21:33+5:302017-12-03T11:24:01+5:30
भारताच्या दक्षिण किनारपट्टी प्रदेशात निर्माण झालेल्या ओखी या चक्रिवादळाचा फटका गोव्यातील राष्ट्रीय स्वीमथॉन स्पर्धेला बसला. रविवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून ही स्पर्धा सुरु होणार होती.
- सचिन कोरडे
पणजी - भारताच्या दक्षिण किनारपट्टी प्रदेशात निर्माण झालेल्या ओखी या चक्रिवादळाचा फटका गोव्यातील राष्ट्रीय स्वीमथॉन स्पर्धेला बसला. रविवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून ही स्पर्धा सुरु होणार होती. शनिवारी रात्री समुद्राच्या हालचाली धोकादायक बनल्या, समुद्र पूर्ण:ता फेसळलेला होता. लाटा सुद्धा ५-६ मीटर उंच जात होत्या त्यामुळे या स्पर्धेला रद्द करण्यात आले. स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या ७०० जलतरणपटूंची तसेच पालकांची मात्र निराशा झाली. पुढील ४८ तासांत कुणालाही समुद्रात जाता येणार नाही, असे आवाहन गोवा सरकारकडून करण्यात आले. त्यामुळे आम्ही ही स्पर्धा रद्द केली आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न असून आम्ही धोका पत्करु शकत नाही, असे अखिल भारतीय जलतरण संघटनेचे सचिव कमलेश नानावटी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
स्वीमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) मान्यतेने या स्पर्धेकडे राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा म्हणूनही पाहिले जात होते.या स्पर्धेतील १० किमी आणि ५ किमी गटातील विजेत्या पुरुष व महिला खेळाडूस फिना वर्ल्ड चॅम्पियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रकूल क्रीडा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे या स्पर्धेकडे देशभरातील जलतरणपटूंचे लक्ष लागले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत देशातील स्टार स्वीमर्स सहभागी झाले होेते. त्यात वीरधवल खाडे, तलाशा प्रभू, साजन प्रकाश, संदीप सेजवाल, मंदार दिवसे आणि रुचा यांचा समावेश होता. उल्लेखनिय म्हणजे, आशियाई स्पर्धेची तयारी करणारा भारताचा आघाडीचा जलतरपणपटू साजन प्रकाश हा बँकॉंक येथूनया स्पर्धेसाठी आला होता. त्याच्याप्रमाणेच इतरांनाही आता स्पर्धा न खेळताच घरी परतावे लागणार आहे.
यासंदर्भात, स्पर्धेचे मुख्य आयोजक स्क्वेअर आॅफ स्पोटर््सचे आशिष अग्रवाल म्हणाले, डिसेंबर हा महिना समुद्रात पोहण्यासाठी अनुकूल असतो. पर्यटन हंगाम असतानाही आम्ही याच महिन्याची निवड केली. मात्र निसर्ग आपत्तीला आपण थांबवू शकत नाही. आज समुद्रातील हालचाली धोकादायक आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आम्ही पुढे ढकलत आहोत. स्पर्धेतील सर्व खेळाडूंची नोंदणी फि त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. तसेच स्पर्धेची पुढील तारीखही कळविण्यात येईल.
दरम्यान, १० किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्या पुरुष - महिला जलतरणपटूंना प्रत्येकी ५० हजार, तर ५ किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची संधी होती. एकूण ४० लाख रुपयांची ही बक्षिसे आहेत.