राज्यसभा अध्यक्षांची थट्टा करणाऱ्या राहुल गांधीवर कारवाई करा: गोवा भाजप मंडळाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:40 PM2023-12-21T14:40:47+5:302023-12-21T14:41:31+5:30
राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन
नारायण गावस
पणजी: संसदेमध्ये उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष यांची थट्टा केलेल्या खासदारांना पाठींबा दिल्या बद्दल भाजप पक्षातर्फे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर कडक कारवाईची मागणी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजप कार्यालयासमोर भाजप सरचिटणिस दामू नाईक, मंत्री राेहन खंवटे, मंत्री आलेक्स सिक्वेरा तसेच इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांचा पुतळा दहन केला. यावेळी भाजपचे नेेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे सरचिटणिस दामू नाईक म्हणाले, कॉँग्रेसचे वरिष्ठ नेेत तसेच कॉँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले राहुल गांधी यांना हे शोभत नाही त्यांच्या अशा या हरकतीमुळे देशभर त्यांची लाेकांकडून खिल्ली उडविली जात आहे. उपराष्ट्रपती पदाचे मान राखणे गरजेचे आहे. अशा थट्टा करणाऱ्यांना पाठींबा देणे चुकीचे आहे. म्हणून राहुल गांधी यांची लोकप्रियता घटत आहे.
पर्यटन मंत्री राेहन खंवटे म्हणाले, संसदे सारख्या पवित्र जागेत अशी कॉमेडी करु नये. राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांना कॉमेडी करायची असेल तर एखादा कॉमेडी चित्रपट काढावा. त्यांनी कितीही माेदींची खिल्ली उडविली म्हणून त्यांची लाेकप्रियता कमी हाेणार नाही. यंदाच्या लाेकसभेत भाजप ४०० चा आकडा पार करणार आहे. त्यामुळे कॉँग्रेस फक्त कॉमेडी करायला उरली आहे. भाजपने एक भारत श्रेष्ठ भारत नारा दिला आहे. सर्व जाती धर्माचे लाेकांना पुढे घेउन जात आहे. भारत विकसित भारत होत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपली लाेकप्रियता सांभाळावी.
मंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले अशा महनीय व्यक्तींची संसदेत थट्टा करणे चुकीचे आहे. तसेच त्यांना पाठींबा देणेही चुकीचे आहे. राहुल गांधी यांचे हे कृत्य चांगले नसल्याने आज देशभर त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जात आहे.