पणजी : ताळगाव पंचायतच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्भूमीवर गोवा राज्य निवडणूक आयोगाने ताळगांव पंचायत वॉर्डाची निवडणुकीच्या दृष्टीने पुनर्रचना केली असून त्याचा मसुदा तिसवाडी तालुका मामलेदार कार्यालयात तसेच ताळगांव पंचायतीत जनतेसाठी खुला केला होता. ९ मार्चपर्यंत तो मसुदा जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दरम्यान ताळगांवातील मतदारांनी आक्षेप, सूचना यावेळी नोंदवली आहे. लवकरच निवडणुकीची तारीखही निश्चित होणार आहे.
ताळगांव पंचायतीत एकूण ११ वॉर्ड असून पुढील एप्रिल महिन्यात तेथील निवडणूक घेणे बंधनकारक आहे. पंचायतीची वर्षाची कारकिर्द ९ एप्रिल रोजी संपुष्टात येत असून निवडणुकीसाठी आयोगाने तयारी सुरु केली आहे. ताळगाव पंचायतची निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर होणार असल्याचे मानले जात आहे.
तिसवाडी तालुका मामलेदाराना मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमले असून मामलेदार कार्यालयातील अव्वल कारकून यांची साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी या नात्याने नियुक्ती केली आहे. अजून मतदानाची तारीख जाहीर झालेला नाही तथापि उमेदवारांनी निवडणूक तयारी सुरु केल्याचे सांगण्यात आले.
लवकरच निवडणुकीसाठी रखिवतेबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानंतर खऱ्याअर्थाने उमेदवार निश्चित होणार आहेत. ९ मे २०२४ पर्यंत नवीन पंचायत कमिटी स्थापित होणे गरजेचे आहे. आतापर्यंत केवळ पणजीचे आमदार बाबुश मोस्नेरात यांचे या पंचायतीवर वर्चस्व राहिले आहे. मोस्नेरात कुटुंबीयांचा या पंचायतीवर बोलबाला राहिला असून, यंदाही त्यांनी ठरवलेलं उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त आहे, असे स्थानिकांना वाटते.