पणजी - गोव्यातील पर्यटक टॅक्सी सेवा ही विविध बाजूंनी टीकेची धनी होऊ लागली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून टॅक्सी व्यवसायिक प्रचंड भाडे आकारतात आणि अनेक व्यवसायिक अॅप आधारित टॅक्सी सेवेखाली स्वत: ची नोंदणीही करू इच्छीत नाहीत. यामुळे काही मंत्रीही खूप संतापलेले आहेत. काही टॅक्सीवाल्यांमुळे पूर्ण गोव्याचा टॅक्सी व्यवसाय बदनाम होत आहे आणि याचा फटका पर्यटन उद्योगाला बसेल अशी भीती मंत्री व्यक्त करत आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात विश्वजित राणे हे आरोग्य मंत्री आहेत. राणे म्हणाले की, पर्यटकांकडून टॅक्सी सेवेबाबत खूपच तक्रारी ऐकायला मिळत आहेत. पर्यटकांकडून जास्त पैसे आकारले जातात अशा प्रकारची तक्रार आहे. मीटरनुसार पैसे आकारण्याची पद्धतच नसल्याने हे असे घडते. राणे म्हणाले की, गोव्यात पंचतारांकित हॉटेलच्या खोलीचे दर देखील टॅक्सी भाडयापेक्षा कमी असतात. एवढेच नव्हे तर गोवा- मुंबई विमान प्रवासाचे तिकीट देखील टॅक्सी सेवेपेक्षा कमी असते. गोव्यात गोवा माईल्ससारख्या अॅप आधारित टॅक्सी सेवेची गरज आहे. आपण मुख्यमंत्र्यांसमोरही हा मुद्दा मांडलेला आहे.
गोवा विधानसभेचे उपसभापती असलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. लोबो लोकमतशी बोलताना म्हणाले, की टॅक्सी हा एकमेव व्यवसाय गोमंतकीयांच्याच हातात आहे. या व्यवसाय क्षेत्रात परप्रांतामधील कुठच्या कंपनीचा शिरकाव नको. सरकारने गोव्यातील सर्व टॅक्सींसाठी जीपीएस आणि डीजीटल मीटर लागू करण्याचे यापूर्वी ठरविले. त्यासाठी निविदाही जारी केली आणि कंत्रटदारही निश्चित केले. हे डिजीटल मीटर देखील अॅप आधारितच असतील. मग सरकार गोवा माईल्स अॅपखाली नोंदणी होण्याची सक्ती टॅक्सी व्यवसायिकांना का म्हणून करत आहे असा प्रश्न निर्माण होतो. गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांना दोन्ही बाजूंनी त्रास होईल अशी पाऊले सरकारने उचलू नयेत.
अॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री
राज्यात पर्यटन व्यवसाय वाढायला हवा आणि त्यासाठी अॅप आधारित टॅक्सी सेवा गरजेची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतयांनी मंगळवारी येथे सांगून पूर्ण मंत्रिमंडळ गोवामाईल्स सेवेसोबत असल्याचेच स्पष्ट संकेत दिले. जे अॅप आधारित टॅक्सी सेवेला विरोध करतात, त्यांचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीत अॅप आधारित टॅक्सी सेवा व दक्षिण गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांनी चालविलेले आंदोलन याविषयी चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी ठामपणे अॅप आधारित टॅक्सी सेवेची पाठराखण केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांनी अगोदर एक महिना तरी, अॅप आधारित टॅक्सीसेवेशी स्वत:ला जोडून घ्यावे. स्वत:ची नोंदणी करावी, असे सावंत यांनी सांगितले.