फोंड्यात पाणी विभागाच्या पंप ऑपरेटरला मारहाणीनंतर तणाव, एकाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 04:58 PM2024-05-21T16:58:28+5:302024-05-21T16:59:31+5:30

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पंप ऑपरेटरला मारहाण केल्याचा प्रकार येथे घडला.

tension after assault on pump operator of water department in phonda case against one | फोंड्यात पाणी विभागाच्या पंप ऑपरेटरला मारहाणीनंतर तणाव, एकाविरोधात गुन्हा

फोंड्यात पाणी विभागाच्या पंप ऑपरेटरला मारहाणीनंतर तणाव, एकाविरोधात गुन्हा

अजय बुवा, फोंडा : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पंप ऑपरेटरला मारहाण केल्याचा प्रकार येथे घडला. यानंतर संतप्त झालेल्या पंप ऑपरेटर्सनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी नागेश जगन्नाथ नाईक या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, दाग येथील सार्वजनिक बांधकाम खात्याशी संलग्न पंप ऑपरेटर गोविंद उर्फ प्रदीप विष्णू गावकर (रा. तळावली फोंडा) हा शांतिनगर येथील पाण्याच्या टाकीवर कार्यरत आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान नागेश नाईक हा टाकीच्या ठिकाणी आला. अनियमितपणे पाण्याचा पुरवठा का होतो? यावरून ऑपरेटरशी त्याने वाद घातला. ऑपरेटर त्याची समजूत काढत असतानाच सरळ त्याने गोविंद गावकर या पंप ऑपरेटरवर हल्ला चढवला. त्याला बेदम मारहाण करून तो तिथून निघून गेला. 

सोमवारी संध्याकाळीच गोविंद गावकरने पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवली. तक्रार दाखल करूनसुद्धा संशयितास अटक होत नाही ते पाहून सकाळी दहा वाजल्यापासून फोंडा तालुक्यातील पंप ऑपरेटर्स पोलीस स्थानकावर गोळा झाले. त्यांनी तिथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक होत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा निर्धार पंप ऑपरेटर्सनी केला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या फोंडा कार्यालयाचे प्रमुख अभियंते यशवंत मापारी यांनी मारहाण केलेल्या युवकाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी नंतर नागेश नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलेकर याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पंप ऑपरेटर पोलिस स्थानकावर...

सकाळपासून पंप ऑपरेटर पोलीस स्थानकावर जमा होत आहेत ते पाहून पोलिसांनी चांगला बंदोबस्त सुद्धा ठेवला होता. जोपर्यंत संशयताला अटक होत नाही, तोपर्यंत कोणताच पंप ऑपरेटर कामाला जाणार नाही असा पवित्रा नंतर सर्वांनी घेतला. पंप ऑपरेटर्स कामाला गेले नाहीत तर पाण्याचे नियोजन करणे हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात आल्याने शेवटी अधिकारी वर्गाने सुद्धा या घटनेत लक्ष घातले.

तीव्र संताप-

यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना पंप ऑपरेटरचे भाऊ व वाडी तळावली पंचायतीचे उपसरपंच दीलेश गावकर म्हणाले की, सरकारी कर्मचारी काम करत असताना त्याला विनाकारण मारहाण करणे हे योग्य नाही. गोविंद गावकर याला नागेश नाईक यांनी विनाकारण मारहाण केली. मारहाणीमुळे सर्व ऑपरेटर्सच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्या घटनेचे दखल घेऊन सदर युवकाविरुद्ध कडक कारवाई करावी. जेणेकरून इतर ऑपरेटर्सना दिलासा मिळू शकेल. भविष्यात सरकारी कर्मचाऱ्यावर हात उभारताना लोक  दहा वेळा विचार करतील. दरम्यान, संध्याकाळीपर्यंत त्याला अटक न झाल्यास बुधवारी युनियनमार्फत संपूर्ण गोव्याचे ऑपरेटर्स आंदोलनात सहभागी होतील असा इशारासुद्धा ऑपरेटर्सनी यावेळी दिला होता. दरम्यान मारहाण झालेल्या ऑपरेटरवर फोंडा येथील सब जिल्हा इस्पितळात उपचार चालू आहेत.

Web Title: tension after assault on pump operator of water department in phonda case against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.