सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: मोहम्मद पैंगबर यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्टर टाकल्यामुळे मुस्लिम बांधव आक्रमक झाले असून, संशयितावर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करुन आज शनिवारी संबधितांनी मडगावच्या दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात एकत्र येउन वरील घटनेचा तिव्र निषेध केला. जो पर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तो पर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नाही असा आक्रमक प्रवित्राही जमावाने घेतला. सकाळी नउच्या सुमारास जमलेला हा जमाव दुपारी तीनच्या नंतर माघारी परतला. या घटनेमुळे मडगाव भागातील वातावरण सदया तंग बनले आहे. पोलिस सर्व स्थितीवर नजर ठेवून आहेत. अज्ञाताने सोशल मिडियाच्या इंस्ट्राग्रामवर माेहम्मद पैंगबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टर टाकले आहे. काल शुक्रवारी रात्री यासंबधी मायणा कुडतरी व फातोर्डा पोलिस ठाण्यातही या लोकांनी तक्रार दिली होती.
शनिवारी सकाळी नउच्या सुमारास मुस्लिम बांधव दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर एकटावले. संशयिताला त्वरीत अटक करा अशी मागणी करताना मुस्लिमांनाच लक्ष्य बनविले जात असल्याचा आरोपही यावेळी जमावाने केला. हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला हेही यावेळी पोलिस ठाण्यात हजर होते. पोलिसांनी आम्ही या प्रकरणाचा तपास करु असे सांगूनही जमावाचे समाधान झाले नाही. आताच अटक करा अशी मागणी करुन जमावाने पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला. मडगाव विभागाचे पोलिस उपअधिक्षक संताेष देसाई यांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तक्रारीची दखल घेतली आहे.
या प्रकरणाचा तपास चालू आहे. सायबर पोलिस व अन्य संबधित यंत्रणेला कळविण्यात आले आहे. दोषीवर निश्चित कारवाई होईल असे देसाई यांनी या जमावाला सांगून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावापैंकी काहीजण काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिस ठाण्याच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या मांडला. अधूनमधून पावसाची रिपरिप चालू होती. पावसातही जमाव बाहेर जमला होता.परिस्थितीचे गांर्भीय जाणून सासष्टीतील अन्य पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व पोलिस कुमक बोलावून घेण्यात आली. पोलिसांनी प्रवेशव्दाराजवळ कडेही उभारले. शेवटी दुपारी तीनच्या सुमारास जमाव पांगला.