पणजी : क्रांतीवीर स्व. मोहन रानडे यांच्या सुटकेला पूर्ण झालेली ५५ वर्षे आणि त्यांनी लिहीलेल्या ' सतीचे वाण ' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे नुकतेच पुण्यात प्रकाशन झाले. या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी (दि. २४) पुण्यात स्वत: रानडे यांनीच दोनेक दशकांआधी स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेच्यावतीने 'आठवणीतील मोहनदादा' या कार्यक्रमाचे आयोजन पणजीत केले आहे.
'सतीचे वाण ' च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला माजी सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते पुण्यात खास कार्यक्रमात झाले होते. क्रांतीवीर मोहन रानडे यांचे स्मरण करण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम त्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पणजी जिमखाना मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि धेंपे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज कामत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. गोवा म्युझियमचे माजी संचालक लक्ष्मण पित्रे या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी असतील. रानडे यांच्यावरील विशेष लघुमाहितीपट यावेळी दाखवला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष एम. डी. देशपांडे यांनी केले आहे.