मगोपच्या विलीनीकरणाचा प्रश्नच नाही, मुख्यमंत्रिपदही यापूर्वी नाकारले : सुदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 07:55 PM2017-12-11T19:55:09+5:302017-12-11T19:55:29+5:30
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.
पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण यापूर्वी भाजपाने दिलेली मुख्यमंत्रिपदाची ऑफर देखील नाकारून मगोपचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. यापुढेही कायम असेल, असे मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे सांगितले.
मगोपची येत्या 17 रोजी आमसभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री ढवळीकर यांनी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार दीपक प्रभू पाऊसकर, माजी आमदार नरेश सावळ, कार्याध्यक्ष नारायण सावंत आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. मगोपचे विलीनीकरण होणार असल्याच्या अफवा परसविल्या जात आहेत. यापूर्वीच्या काळात भाजपने व काँग्रेसनेही दिलेली ऑफर आपण नाकारली आहे. मगोपमुळे आपली आमदार म्हणून कारकीर्द सुरू झाली. मगोप हा गोमंतकीयांच्या हृदयातील आणि या मातीतील पक्ष आहे. यापूर्वी युजी पक्ष होता. तो इतिहासजमा झाला. मगोप मात्र गेली पन्नास वर्षे गोव्याच्या विधानसभेत आहे. सध्या जे सरकार भाजपने घडवले आहे, ते केवळ मगोपमुळे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होत असतील तर आम्ही सरकारसोबत आहोत, असे सांगून आम्ही भाजपसोबत सरकार स्थापन केले, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. भाजपने सध्या आम्हाला कोणतीच अट घातलेली नाही. एकदाच भाजपच्या नेत्यांनी मगोपचे विलीनीकरण भाजपमध्ये केल्यास मुख्यमंत्रिपद देऊ, असे आपल्याला सांगितले होते. पण आपण नकार दिला. मगोप हा केंद्रातील एनडीएमध्ये सहभागी व्हावा असा ठराव पक्षाच्या केंद्रीय समितीने अजून घेतलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी काय भूमिका घ्यावी ते मगो पक्ष ठरवेल. येत्या 17 रोजी मगोपच्या आमसभेवेळी विद्यमान केंद्रीय समितीला मुदतवाढ द्यावी की काय तेही आमसभेतच ठरणार आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
काही पक्षांचे नेते मगोपला घाबरतात व त्यामुळे अफवा पसरविल्या जातात. काहीजण काँग्रेसधार्जिणे आहेत. त्यांना भाजपची साथ मगोपने सोडावी असे वाटते. आघाडी सरकार असते तेव्हा तडजोडीची भूमिका घ्यावी लागते, अन्यथा संसार दुभंगतो व घटस्फोट घ्यावा लागतो. तडजोडीची भूमिका घेऊन मगो पक्ष संसार चालवत आहे, असेही ढवळीकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. दरम्यान, पूर्ण मगो पक्ष संघटीत असून लोकही मगोसोबत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी गोमंतकीयांनी 12 ते 13 टक्के मते मगोपला दिली आहेत, असे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले. माङया मतदारसंघातील व गोवाभरातील लोक मगोपवर खूश आहेत. मी कार्यकर्ता होतो, मला मगोपने आमदार केले, असे पाऊसकर म्हणाले.