गोव्यात मोडी लिपीतील पुरातन दस्तऐवजांचे होणार लिप्यंतरण, सरकारी पातळीवर तज्ज्ञांची लवकरच विशेष समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 01:28 PM2017-12-06T13:28:33+5:302017-12-06T13:29:35+5:30
गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे.
पणजी : गोव्यातील पुरातत्त्व, पुराभिलेख खात्याकडे असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे मोडी मराठी लिपीतील दस्तऐवजांचे लिप्यंतरण करण्याचे महत्त्वाचे काम लवकरच हाती घेण्यात आले आहे. सरकारी पातळीवर त्यासाठी तज्ज्ञांची विशेष समिती स्थापन केली जाणार आहे.
पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सहा तज्ज्ञांनी मळा, पणजी येथील पुरातत्त्व खात्यातील या दस्तऐवजांवर काम सुरु केले आहे. पोर्तुगीज काळातील कायदेविषयक महत्त्वाच्या दस्तऐवजांचा यात समावेश आहे.
हे दस्तऐवज पुणे येथे हलविल्यास नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेच या दस्तऐवजांच्या लिप्यंतरणाचे काम केले जात आहे. हे कागदोपत्री दस्तऐवज अत्यंत पुरातन असल्याने फाटण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळ त्यावर काम करण्यासाठी तज्ज्ञांनाच येथे बोलावल्याचे खात्यातील अधिकारी बालाजी शेणई यांनी सांगितले. या कामासाठी ४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोव्याच्या पुरातत्त्व, पुराभिलेख विभागाकडे शेकडो वर्षांपूर्वीची ५ हजारांहून अधिक पुरातन हस्तलिखिते आहेत. मोडी लिपीत लिहिलेल्या नोंदीचे दस्तऐवजही आहेत. काही पेशवेकालीन दस्तऐवज आहेत. त्या काळी गोवा आणि सावंतवाडीचे सावंत, कोल्हापूरचे राजे, सौंदे राजे, हैदर अली, पेशवे यांच्यामधील पत्रव्यवहार मोडी लिपीतून होत असत. अशा प्रकारचे काही दस्तऐवज यात आहेत.
सरकारी समिती करणार शहानिशा
पुण्याचे सहा तज्ज्ञ दर महिन्याला आठवडाभर या दस्तऐवजांच्या लिप्यंतरणाचे काम करतात. काही दस्तऐवजांमध्ये कोकणी तसेच पोर्तुगीज शब्द मोडी लिपीतून आलेले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर सरकारची समिती या लिप्यंतरणाची शहानिशा करणार आहे. या समितीवर मोडी लिपीचे तज्ञ असतील. महाराष्ट्रातील काही तज्ञांनाही या समितीवर स्थान दिले जाईल. समितीने प्रमाणीकरण केल्यानंतर सर्व तपशीलाचे संकलन केले जाईल आणि हे लिप्यंतरण जनतेसाठी तसेच संशोधकांसाठी खुले केले जाईल.
गोव्यात केवळ पुरातत्त्व आणि पुराभिलेख विभागाकडेच मोडी लिपीतील दस्तऐवज आहेत, असे नव्हे तर खासगी मालकीचेही असे काही दस्तऐवज आहेत. ‘आर्कायव्हो हिस्तोरिनो दि इस्तादो दा इंडिया’ या नावाने पोर्तुगीज जुने कायदे, आर्थिक तसेच राजकीय विषयातील पत्रव्यवहार आहेत. मोडी लिप्यंतरणाच्या सरकारच्या या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत होत आहे. ही लिपी कशी वाचावी हे लोकांना शिकविले पाहिजे. भाषातज्ञांकडून जुन्या लिपीचा अभ्यास व्हायला हवा, शिक्षकांनीही ही लिपी शिकून घ्यावी. या लिपीतून धावती अक्षरे लिहिली जात असल्याने टाइपसेटरनाही प्रशिक्षित करावे, असे मत काहीजणांनी व्यक्त केले. डिजिटलायझेशन ही काळाची गरज आहे. नवशिक्या टेक्नॉलॉजी सेव्हींना अॅपव्दारे मोडी लिपी शिकणे सोयीचे होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.