चोरीसाठी अल्पवयीनांचा वापर; पुण्यातील महिलांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:55 AM2023-05-29T10:55:09+5:302023-05-29T10:55:43+5:30
पुणे रेल्वेस्थानकाजवळील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: लहान मुलीचा वापर करून दारूच्या दुकानात चोरी करणाऱ्या तिघा महिलांच्या टोळीला रविवारी (दि. २८) वास्को पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. सुतुकला काले (वय ४०), पल्लवी शिंदे (वय २९) व नंदिनी कुंभार (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. त्या तिघीही पुणे रेल्वेस्थानकाजवळील झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बायणा येथील एका मद्यविक्री दुकानात तीन महिलांनी दारू खरेदी गेली. त्यांनी दुकानदारास बोलण्यात गुंग ठेवले. त्याचवेळी महिलांबरोबर असलेली सात वर्षीय मुलगी दुकानदाराच्या गल्ल्यातून रक्कम काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दुकानातील कर्मचाऱ्याने तिला रंगेहात पकडले. यावेळी तिच्याजवळील पैसे काढून घेतल्यानंतर त्या महिला मुलीला घेऊन पसार झाल्या. पोलिसांनी घटनेची दखल घेत त्यांना अटक केली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११:३० वाजता चोरीचा प्रकार घडला. बायणा वास्को येथे असलेल्या एका मद्यविक्री दुकानात तीन महिला गेल्या. त्यांच्याबरोबर एक सात वर्षांची मुलगी आणि एक दोन वर्षांचा चिमुकला होता. दुकानात पोचल्यानंतर त्या महिलांनी दुकानातील कर्मचाऱ्याकडे 'बिअर' मागितली. त्यावर विविध प्रकारची बिअर मागत महिलांनी त्या दुकानदास बोलण्यात गुंग ठेवले. त्याचवेळी महिलांनी सोबत आणलेल्या मुलीला आत पाठवले. मुलीने शिताफीने दुकानदाराच्या गल्ल्यात हात घालून पैसे काढून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना एका कर्मचाऱ्याने त्या मुलीला पकडून पैसे काढून घेतले.
त्याचवेळी महिलांनी मुलीला घेऊन तिथून पोबारा केला. यावेळी दुकानदाराने गल्ल्यातील रक्कम मोजली असता १ हजार ८०० रुपये त्यांनी लंपास केल्याचे समजले. दुकानदाराने घटनेची माहिती पोलिसांना दिली.
आणखी चार महिलांना अटक
वास्को पोलिसांनी मद्यविक्री दुकानातून चोरी करणाऱ्या तीन महिलांच्या टोळीबरोबर अन्य चार महिलांना संशयास्पद फिरत असल्याच्या कारणास्तव अटक केली आहे. त्या चौघीही पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन अल्पवयीनांची 'अपना घरात' रवानगी
त्या महिलांबरोबर असलेल्या त्या दोन वर्षांच्या मुलाची आणि सात वर्षांच्या मुलीची 'अपना घरात रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलांनी बाणा येथील मद्यविक्री दुकानात केलेल्या चोरीचा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी दिली.