ग्रामस्थ-पुरोहित भिडले! मडकई नवदुर्गा मंदिरातील 'दान' सामग्रीवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 11:22 AM2024-12-10T11:22:28+5:302024-12-10T11:23:30+5:30
म्हार्दोळ पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी, गावातील वातावरण तापले; पोलिसांचा बंदोबस्त तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मडकई येथील नवदुर्गा मंदिरातील 'दान' करण्यात येणाऱ्या सामग्रीवरून काल सोमवारी मोठा गोंधळ झाला. या सामग्रीवर हक्क कोणाचा, यातून वादावादी होऊन काही युवकांनी पुरोहितांना बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर पुरोहितांनी म्हार्दोळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर काही महिलांनी पुरोहितांकडून आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तानुसार, काल मंदिरात सोमप्रकाश नवमी असल्या कारणाने सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर सकाळी सहा वाजल्यापासून भटजींकडून देवकार्य सुरू होते. यावेळी मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून देवीला वाहण्यात येणारे सामान भटजी एका बाजूला ठेवत होते. त्याच वेळी ग्रामस्थांपैकी काहीजण मंदिरात शिरले व त्या उत्पन्नावर त्यांचाही हक्क असल्याचे सांगत वाद घालायला सुरुवात केली. तर भटजींनी त्यावर आपला हक्क असल्याचे सांगितले.
वादावादी सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून ग्रामस्थांना बाजूला काढले. त्यानंतर आठच्या सुमारास पुरोहितांपैकी विभव राजीव घैसास हे मंदिराच्या बाजूलाच असलेल्या आपल्या घरी जात असताना सनद नाईक या युवकाने त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर घैसास यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मारहाणीची दखल घेत मंदिराच्या पुरोहितांनी पत्रकार परिषदेत त्यांची बाजू मांडली. यावेळी गौरव घैसास, मुख्य पुरोहित प्रशांत घैसास, नितीन घैसास हे उपस्थित होते. वादाबाबत ते म्हणाले की, मागच्या अनेक पिढ्या आम्ही पुरोहित म्हणून श्री नवदुर्गा चरणी सेवा देत आलो आहोत. देवीला जे काही दान स्वरूपात देण्यात येते यावर आमचा हक्क आहे. सकाळीसुद्धा आम्ही नारळ, तांदूळ वगैरे स्वीकारत असताना काही लोकांनी ते आमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु आम्ही त्यास अटकाव केला. त्या रागातूनच विभव घैसास याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सनथ नाईक (म्हालवाडा मडकई), प्रतीक नाईक या दोघांनी अपशब्द वापरून बेदम मारहाण केली असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करावी. सध्या नवदुर्गा प्रतिष्ठान व महाजन यांच्यासंदर्भात जो वाद निर्माण झाला आहे त्यात आमच्याबद्दल काही गैरसमज पसरवले जात असल्याचेही ते म्हणाले.
मंदिरातील पुरोहितांना मारहाण झाल्याची महिती मिळताच म्हार्दोळचे निरीक्षक योगेश सावंत हे पथकासह दाखल झाले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत हेसुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. झालेल्या प्रकारामुळे मंदिर परिसरात दिवसभर तणाव निर्माण झाला होता. दिवसभर मंदिर परिसरात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
आधी पुरोहितांकडून महिलांना धक्कबुक्की?
दरम्यान, काही महिलांनी म्हार्दोळ पोलिसांत धाव घेत पुरोहितांनीच आपल्याला धक्काबुक्की केल्याची तक्रार दिली आहे. याबाबत सतीश नाईक व विशाखा गडाम्बी म्हणाल्या की, देवकृत्य चालू असताना काही पुरोहितांनीच आमच्या महिलांचा शाब्दिक अपमान केला. म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो होतो. त्यावेळी दान केलेले सामान तिथे पडले होते ते उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला. यादरम्यान महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. आपल्या कुटुंबातील स्त्रियांना धक्काबुक्की केल्याचे लक्षात आल्यानंतर काही युवकांनी त्यांना त्यासंदर्भात जाब विचारला एवढेच.