पणजी : रेल मार्ग दुपदरी करणाच्या कामाला विरोध करण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली हुबळी येथे दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
रेल मार्ग दुपदरीकरणाचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी दक्षिण-पश्चिम रेल्वे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'ओन्ली गोल, से नो टू कोल', 'आमका नाका, आमका नाका, डबल ट्रेकिंग नाका', आदी घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, दक्षिण गोवाकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्यो डायस आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. काही महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलनात भाग घेतला.
आंदोलनाच्या वेळी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, गोवा हे कर्नाटक किंवा महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यापेक्षाही लहान आहे. गोवा राज्याला रेल दुपदरीकरणणाची गरज नाही. 'सिंगल ट्रॅक' पुरेसा आहे. गोव्यात येणारे पर्यटक येथील कोळसा प्रदूषण पाहण्यासाठी नव्हे, तर निसर्गसंपदा पाहण्यासाठी येतात. पर्यटनाच्या दृष्टीने गोवा देशासाठी मानाचा तुरा आहे. आम्हाला गोव्यातील पर्यावरण, निसर्गसंपदा नष्ट करायची नाह. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने रेल मार्ग दुपदरीकरणावर फेरविचार करावा आणि हा प्रकल्पच रद्द करावा, अशी आमची मागणी आहे.
कामत म्हणाले की, 'लोकभावनेचा आदर करून रेल्वेने हे पाऊल उचलायला हवे. मी गोव्यात मुख्यमंत्री असताना १७ सेझना जनतेकडून विरोध झाला तेव्हा ते रद्द केले.' दरम्यान, रेल्वे मार्ग दुपदरीकरणाविरोधात चाललेल्या आंदोलनात काँग्रेस सक्रियपणे उतरली आहे. चांदोर येथे लेव्हल क्रॉसिंगवर अलीकडेच रात्रभर झालेल्या आंदोलनातही काँग्रेसने भाग घेतला होता.