लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: कर्नाटकानंतर महाराष्ट्रानेही म्हादईचा प्रवाह गोव्यापासून तोडण्याचा सुरू केलेला प्रयत्न तूर्त थांबला आहे. गोव्याच्या आक्षेपानंतर महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम थांबविले आहे. धरणाचे काम थांबविले असल्याची खात्री करून घेण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी विर्डी येथे धरण परिसराला मंगळवारी सकाळी भेट दिली.
या पथकात जलस्रोत खात्याचे संचालक प्रमोद बदामीही होते. धरणाचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली, तसेच त्या साइटची छायाचित्रेही त्यांनी घेतली आहेत. विर्डी येथे महाराष्ट्र सरकारने धरणाचे बांधकाम सुरू केल्याचे पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी उघडकीस आणल्यानंतर एकच गोंधळ माजला होता. कर्नाटकनंतर महाराष्ट्रही बेकायदेशीरपणे म्हादई वळविण्याचे काम सुरू करते आणि गोवा सरकारला याची भनकही लागत नाही, या गोष्टीमुळे पर्यावरणवाद्यांनी संतापही व्यक्त केला होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला सोमवारी नोटीस बजावली होती. विर्डी येथे धरणाचे बांधकाम कोणत्या अधिकारणीची परवानगी घेऊन सुरू करण्यात आले त्याचे स्पष्टीकरण मागितले होते. तसेच चालू असलेले बांधकाम त्वरित बंद करण्यास सांगितले होते.
मंगळवारी महाराष्ट्र सरकारकडून हे बांधकाम बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर, लगेच या साइटवर बांधकाम सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
कायम पाळत ठेवा
अचानक कुणाला कल्पनाही न देता आणि कुणाचीही परवानगी न घेता, विर्डी धरणाचे बेकायदेशीर काम सुरु करण्याचा एकदा प्रकार घडल्यामुळे आता यापुढे सरकारला या साइटवर कायम पाळत ठेवावी लागणार आहे. कारण बंद केलेले काम हे पुन्हा केव्हाही सुरू होऊ शकते, अशी भीतीही पर्यावरणवाद्यांनी वर्तविली आहे.
मुख्यमंत्र्यांची आक्रमकता
महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे कामे युद्धपातळीवर सुरु केले होते. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेताना महाराष्ट्राला नोटीस बजावली, तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेकायदा कामाबाबत विचारणा केल्यानंतर, आजपासून विर्डी येथील काम थांबविण्यात आले आहे.
- गोव्याच्या जल संसाधन खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी मंगळवारी सकाळी विर्डी धरण परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, या ठिकाणी काम बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले.
- बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे, तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर निरीक्षण करण्यास पाठविले. या टीमने या भागाची पाहणी केली. आपला अहवाल सदर केला आहे.
- मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून, तपशील गोळा करण्यास सुरुवात केली आहे. विर्डी येथील काम बेकायदा असल्याने, याबाबत पुरावे गोळा केले जात आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"