पणजी : राज्यात ठिकठिकाणी असलेल्या पाणी टंचाईची स्वेच्छा दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे कान टोचताना माजोर्डा, कलाटा, शापोरा, आसगांव आणि हणजुण येथील पाणी समस्या विनाविलंब सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.
माजोर्डा, कालाटा भागातील ग्रामस्थांना ६० दिवसांच्या आत विद्यमान मेटॅलिक जीआय पाइपलाइनच्या जागी पीव्हीसी पाइपलाइनद्वारे बसवून पाणी द्यावे तसेच आसगांव, शापोरा आणि हणजुण या भागांना सोनारखेड, आसगाव येथे ५.६ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम आणि अस्नोडा जलशुद्धीकरण केंद्राचे अतिरिक्त ३० एमएलडी पाणी प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
नुकता कुठे उन्हाळा सुरु होत असताना राज्यात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची स्वतःहून दखल घेत गोवा मानवी हक्क आयोगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वरील निर्देश दिले आहेत.
दक्षिण गोव्यात माजोर्डा आणि कालाटा येथे अनेक कुटूंबांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे तसेच शापोरा, हणजुण व आसगांव येथे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई आहे. प्रसार माध्यमांनी यावर प्रकाश टाकल्याने त्याची स्वेच्छा दखल आयोगाने घेतली आहे.