गोव्यात येतो तेव्हा कमतरता भासते; नरेंद्र मोदींनी काढली मनोहर पर्रीकरांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:18 PM2022-02-10T20:18:55+5:302022-02-10T20:52:58+5:30
Goa Election 2022 : पर्रीकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत…आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हापसा येथील प्रचारसभेत जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी नरेंद्र यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली. जेव्हा पण मी गोव्यात येतो, तेव्हा मनोहर पर्रीकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
गोव्याच्या भविष्य निर्माणासाठी निवडणुकीत दिवस-रात्र मेहनत करत असलेल्या भाजपचे सर्व कार्यकर्ते, सहकारी आणि गोव्यातील बंधू-भगिनींनो नमस्कार. खरंच गोव्यात तुम्हा सर्वांमध्ये येऊन माझ्यामध्ये एक नवी उर्जा निर्माण होते. इथल्या हवेची गोष्टच काही वेगळी आहे. गोवा एवढ्या बुलंद स्वरात विकास आणि भाजपबाबत बोलत आहे, की तो आवाज दूरपर्यंत जात आहे. गोव्याने हे पक्क केले आहे की, विकासाची ही लाट, सूशासनाच्या या लाटेचा वेग हळू होऊ द्यायचा नाही. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्वात गोव्याच्या सुवर्ण भविष्यासाठी विकासाची ही यात्रा अशी सुरू राहील, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
आज तुम्ही मला ज्या रुपात पाहत आहात त्याची सुरुवात गोव्यातून झाली होती. जून 2013 मध्ये याठिकाणी भाजपची कार्यसमिती पार पडली. तेव्हा मी गोव्याच्या याच धरतीवर होतो. तेव्हा भाजपने मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसमितीचा प्रमुख घोषित केले होते. नंतर मला पंतप्रधान पदाचा उमेदवारही घोषित करण्यात आले. गोव्याच्या मातीतून निघालेली ती प्रेरणा होती. त्या दिवशी आमच्या पर्रीकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत…आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असे नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Whenever I come to Goa, I always miss my dear friend Manohar Parrikar. You Goans must have felt his absence even more. I'm fortunate to be standing here because of the love from the people of Goa: PM Modi #GoaElections2022pic.twitter.com/gKhby2uUdL
— ANI (@ANI) February 10, 2022
14 फेब्रवारी रोजी गोव्यात पुन्हा एकदा एक-एक मतदार कमळ फुलवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदान करणार आहे. मी गोव्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांना भव्य विजयाची खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, जेव्हा पण मी गोव्यात येतो, तेव्हा मनोहर पर्रीकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल. मी भाजपाचे वरिष्ठ नेते दिवंगत फ्रान्सिस डिसुझा ज्यांच्योसोबत काम करण्याची देखील मला संधी मिळाली, यांच देखील स्मरण करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपने गोव्यात विकासाचा मुद्दा मांडला - नरेंद्र मोदी
भाजपने गोव्यात समग्र विकासाचा मुद्दा मांडला. कारण विकासाला तुकड्यात जात, धर्म, भाषा, श्रेत्राच्या नावाने वाटलं जाऊ शकत नाही. साऊथ गोवा आणि नॉर्थ गोव्यात एकत्र काम झाले पाहिजे. जेव्हा आम्ही गोव्याच्या पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करतो. तेव्हा अन्य क्षेत्राचा मुद्दाही उपस्थित होते. त्यामुळे भाजपनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचं नवं अभियान राबवलं आहे. गोव्या स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे अनेक कामे सुरु आहेत. बस डेपो, आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. यामुळे गोव्यात दुसऱ्या उद्योगात, व्यापारात गुंतवणुकीचे मार्ग उघडतील. गोव्यात एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क बवण्याचे काम सुरु आहे. गोव्यात भाजप सरकार आज जे काम करत आहे. त्याची गरज गोव्याला दशकांपूर्वी होती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.